मुंबई : ‘धरती, पृथ्वी, प्रकृती ही सारी मातेची रूपे आहेत, हे मानून पर्यावरण रक्षणाचे काम स्त्रिया किती चोखपणे करू शकतात, हे आजवर अनेक जणींनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्यावरून सिद्ध झाले आहे. आज ज्या दुर्गांचा सन्मान झाला, त्यांनी केलेले कार्य पाहिल्यानंतर प्रत्येक स्त्री स्वतःच दुर्गा का बनत नाही, असा प्रश्न पडतो. या पुरस्कार सोहळ्यात दुर्गांचा सन्मान करायला मिळणे म्हणजे आपणच पुरस्कृत होण्यासारखे आहे’, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.
विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणारा ‘लोकसत्ता दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा मंगळवारी दादर येथील श्री शिवाजी नाट्यमंदिर येथे पार पडला. त्यावेळी मेधा पाटकर यांच्या हस्ते यंदाच्या नऊ ‘दुर्गां’ना पुरस्कार देण्यात आले. ज्येष्ठ लेखिका, पत्रकार, मराठी-इंग्रजी अनुवादक, चित्रपट-कला समीक्षक शांता गोखले यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मेधा पाटकर यांच्यासह यंदाच्या दुर्गा सन्मानच्या मानकरी महिलांच्या हस्ते गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
‘माझे आजवरचे अनुवादाचे, लेखनाचे काम हे बव्हंशी एकट्याने वा अलिप्तपणे केलेले आहे. आज या पुरस्कार सोहळ्यात ज्या दुर्गांचा सन्मान करण्यात आला त्यांनी समाजात मिळून मिसळून ज्या पध्दतीचे कार्य उभारले आहे ते पाहून मन थक्क झाले. अगदी स्त्री वादक कलाकारांनीही एकमेकींना सुरेखपणे साथसंगत करत वाद्य वादनाचा कार्यक्रम सादर केला हे पाहून स्तिमित झालेल्या मला आपण अशा पध्दतीचे लोकाभिमुख कार्य करू शकलो नाही याची जाणीव झाली’, अशी भावना शांता गोखले यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
या सोहळ्यात इंडियन एक्स्प्रेस समूहाच्या प्रकाशिका वैदेही ठकार, ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेडच्या अस्मिता सुळे, चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृहच्या सुरेखा वाळके, ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडचे श्रीरक पेजावर, व्हि एम मुसळुणकर ज्वेलर्सच्या भक्ती मुसळुणकर, डीडीएसआर ग्रुपचे दत्ता वक्षे, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे आदित्य गोळे, वैभवलक्ष्मी डेव्हलपर्सच्या अनिता सांगळे, मेसर्स बी. जी. चितळे डेअरीचे चैतन्य करंदीकर आणि केसरी टूर्सच्या सुनिता पाटील यांच्या हस्ते नवदुर्गांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
एक तपाची वाटचाल पूर्ण केलेल्या ‘लोकसत्ता दुर्गा सन्मान पुरस्कारां’मागचा उद्देश स्पष्ट करताना, ‘दैनंदिन कामातून ऊर्जा मिळवण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे असतात. एखाद्या विषयावर आशा न सोडता एकाच विषयावर कार्य करत राहणे हे महत्वाचे आहे’ असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सांगितले. तसेच, मराठीपणा घेऊन इंग्रजीत वावरणारी माणसे मला आवडतात. शांता गोखले या अशा माणसांपैकी एक आहेत, अशा शब्दांत कौतुक करत त्यांनी दुर्गा जीवनपुरस्कार स्वीकारल्याबद्दल शांता गोखले यांचे आणि या सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल मेधा पाटकर यांचेही त्यांनी आभार मानले. ‘लोकसत्ता चतुरंग’च्या फीचर एडिटर आरती कदम यांनी यंदाच्या पुरस्कार निवड प्रक्रियेची माहिती दिली. ‘पुरस्कारांच्या मानकरी निवडण्याची ही कठीण जबाबदारी यंदा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शारदा साठे, अभिनेत्री आणि कठपुतलीकार मीना नाईक आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री सुषमा देशपांडे यांनी पार पाडली,’ असे त्यांनी आवर्जून सांगितले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा संघर्ष, त्यांनी घेतलेले परिश्रम, यश-अपयशाला तोंड देत सुरू ठेवलेली वाटचाल आपल्या ओघवत्या निवेदनातून लेखिका-अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे यांनी उपस्थितांपर्यंत पोहोचवली. या कार्यक्रमाचे संहिता लेखन ‘लोकसत्ता’च्या विशेष प्रतिनिधी चारुशीला कुलकर्णी यांनी केले. तर या पुरस्कार सोहळ्यात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासह संपूर्ण सोहळा प्रसिध्द निवेदक कुणाल रेगे यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण शैलीतून उलगडला.
वाद्यांवरची सुरेल करामत
यंदाच्या सोहळ्यातील सांगितिक कार्यक्रमही रसिकांना आगळा अनुभव देणारा ठरला. हार्मोनियम, व्हायोलिन, तबला, गिटार, सॅक्सोफोन, बासरी, कीबोर्ड, ऑक्टोपॅड, काँगो, ढोलक अशा विविध वाद्यांचा सुरेल मेळ जुळून आला. नांदी ते कधी गिटारवर वाजणारे निले निले अंबर पर, सॅक्सोफोनच्या तालावर गुंजणारे शारद सुंदर चंदेरी राती, बासरीच्या सुरांनी खुललेले मन उधाण वाऱ्याचे अशी एकापेक्षा एक सुंदर हिंदी व मराठी गाणी सादर होत गेली. शब्दांवाचून कळले सारे अशी ही विविध वाद्यांवरची सुरेल किमया साधणाऱ्या सगळ्या वादक कलाकारही दुर्गाच होत्या. आर्च एंटरप्रायझेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तालवाद्यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. कौशिकी जोगळेकर, शलाका देशपांडे, भावना अंकुश, फेणी भावसार, राधिका अंतुरकर, अमृता ठाकूरदेसाई, विनिता जाधव, प्रेषिता मोरे आणि सुलक्षणा फाटक या कलाकारांनी ही सुरेल मैफल रंगवली होती.
यंदाच्या मानकरी
भारतीय अणु उर्जा कार्यक्रमासाठी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॉ. मंजिरी पांडे, सूक्ष्म जैवतंत्रज्ञानातून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या डॉ. आरोही कुलकर्णी, मोहरी आणि जवसाचे नवीन वाण तयार करणाऱ्या डॉ. बीना नायर, मासे उत्पादन वाढवण्यासाठी जलजीव संवर्धन करणाऱ्या डॉ. स्वप्नजा मोहिते, १८ लाख स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या कुसुम बाळसराफ, ‘अप्लाईड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना करत हजारो एकर खासगी जंगलांचे संरक्षण करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले, ७५ तलावांचे शास्त्रीय पध्दतीने पुनरूज्जीवन करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील शालू कोल्हे, भामरागडसारख्या दुर्गम भागातील गावाचे सरपंचपद भूषवणाऱ्या भाग्यश्री लेखामी, तर ‘निर्माण’ या संस्थेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजातील मुलांचे शिक्षण, स्त्रियांसाठी रोजगार निर्मितीसाठी झगडणाऱ्या वैशाली भांडवलकर या नऊ दुर्गांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.