मुंबई : मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका म्हणून ओळल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानंतर आणि मार्गिकेचे काम सुरु होऊन आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता गुरुवारपासून मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.

लोकार्पणानंतर गुरुवारी सकाळी हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना आरे ते कफ परेड प्रवास केवळ ५६ मिनिटांत करणे शक्य होणार आहे. तर या अतिजलद प्रवासासाठी प्रवाशांना ७० रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील ३३.५ किमीच्या पहिल्या भुयारी मेट्रोच्या कामाची आणि संचलनाची संपूर्ण जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कारॅर्पोरेशनवर (एमएमआरसी)सोपविण्यात आली. त्यानुसार ही मार्गिका मार्गी लावण्याच्यादृष्टीने एमएमआरसीने आवश्यक ती कार्यवाही करत जानेवारी २०१७ मध्ये मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. या मार्गिकेचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने मार्गिका याआधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक आणि इतर कारणांमुळे ती कार्यान्वित होण्यास विलंब झाला. तसेच, कारशेडचा वाद, मार्गिकेसाठीच्या वृक्षतोडीचा वाद यामुळे हा प्रकल्प मुंबईतील सर्वाधिक वादग्रस्त प्रकल्प ठरला आहे.

कारशेडच्या जागेच्या वादामुळे कारशेड आणि परिणामी मार्गिकेच्या कामास विलंब होऊन खर्च वाढल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जाताना दिसतो. पण आता मात्र अखेर ही संपूर्ण मार्गिका पूर्ण झाली असून बुधवारी या मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून आरे ते कफ परेड अशी भुयारी मेट्रो पहिल्यांदाच धावणार आहे. तर मुंबईकरांना आरे ते कफ परेड हा प्रवास केवळ ५६ मिनिटांत करता येणार आहे. आजच्या घडीला हा प्रवास करण्यासाठी पावणे दोन ते दोन तास लागतात.

आरे ते कफ परेड मेट्रो मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ ला वाहतूक सेवेत दाखल झाला. तर बीकेसी ते आाचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. हे दोन टप्पे वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आता संपली आहे आणि मुंबईकरांना आरे ते कफ परेड असा थेट मेट्रो प्रवास करता येणार आहे. गिरगाव, काळबादेवी, महालक्ष्मी, हुतात्मा चौक, विधानभवन, कफ परेड अशा वर्दळीची आणि महत्त्वाची ठिकाणे आता मेट्रोने जोडली जाणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत मेट्रो ३ मार्गिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी आता पूर्ण क्षमतेने मेट्रो ३ मार्गिका धावणार आहे. त्यामुळे, या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमआरसीला आहे. त्यांचा हा विश्वास खरा ठरतो का या मार्गिकेकडे मुंबईकर आकर्षित होतात का येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

गुरुवारपासून २८० फेऱ्या

आरे ते आचार्य अत्रे चौक अशी मेट्रो ३ मार्गिका सध्या वाहतूक सेवेत असून या मार्गिकेवर ३१ पैकी २८ मेट्रो गाड्या रोज धावत आहेत. दररोज या मार्गिकेवर मेट्रो गाड्यांच्या २६२ फेऱ्या होत आहेत. पण आता गुरुवारपासून आरे ते कफ परेड अशी मेट्रो ३ मार्गिका सेवेत दाखल होणार आहे. तेव्हा या मार्गिकेवर गुरुवारपासून मेट्रो गाड्यांच्या २८० फेऱ्या सुरु होणार असल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे. तर गाड्यांची संख्या २८ अशीच असणार आहे. सध्या या मार्गिकेसाठी ३१ मेट्रो गाड्या असून तीन मेट्रो गाड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

गर्दीच्या वेळेस प्रत्येक पाच मिनिटांनी गाडी

आरे ते आचार्य अत्रे चौक मार्गिकेवर मेट्रो गाड्यांच्या २६२ फेऱ्या होत असल्या तरी मेट्रो गाड्यांची वारंवारता आठ ते १० मिनिटे अशी आहे. पण गुरुवारपासून आरे ते कफ परेडदरम्यान गर्दीच्या वेळेस प्रत्येक पाच मिनिटांनी मेट्रो गाडी धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा दिलासा ठरणार आहे.

दररोज सरासरी ७० हजार प्रवासी करतात प्रवास

आरे ते कफ परेड मार्गिकेवरील अपेक्षित दैनंदिन प्रवासी संख्या १३ लाख प्रवासी अशी आहे. तर आरे ते आचार्य अत्रे चौक मार्गिकेवरील अेपक्षित दैनंदिन प्रवासी संख्या साडे सात लाख प्रवासी आहे. मात्र मेट्रो ३ मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून या मार्गिकेला मुंबईकरांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आजच्या घडीला या मार्गिकेवरुन दररोज सरासरी ७० हजार प्रवासी प्रवास करतात. पण आता मात्र संपूर्ण मार्गिका सेवेत दाखल होणार असून ही मार्गिका अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार असल्याने तसेच अतिजलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने यापुढे मात्र या मार्गिकेल चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा एमएमआरसीला आहे.