मुंबई : कुलाबा-वांद्रे-आरे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते आचार्य अत्रे चौक मार्गिकेवरील सेवा कालावधीत मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) वाढ करण्यात आली आहे. सकाळच्या वेळेत सेवा कालावधी ३५ मिनिटांनी वाढविण्यात आला आहे. त्यानुसार आता आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकावर आणि आरे मेट्रो स्थानकावर सकाळी ६.३० वाजण्याऐवजी सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे.

एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गिका आॅक्टोबर २०२४ मध्ये तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्गिका मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो गाड्या चालवल्या जातात. तर रविवारी मात्र सकाळी ८.३० ते रात्री १०.३० अशी मेट्रो सेवेची वेळ होती.

मात्र काही दिवसांपूर्वीच एमएमआरसीने रविवारच्या मेट्रोच्या सेवा कालावधी वाढ करत सकाळी ६.३० वाजल्यापासूनच मेट्रो गाडी सुरु करण्याचा निर्णय घेत या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली आहे. तर आता सोमवारपासून (१५ सप्टेंबर) मेट्रोच्या सेवा कालावधी आणखी ३५ मिनिटांची वाढ केली आहे.

एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार आता आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकावरुन आणि आरे मेट्रो स्थानकावरुन सकाळी ६.३० वाजण्या ऐवजी सकाळी ५.५५ वाजता मेट्रो गाड्या सुटणार आहेत. सेवा कालावधी ३५ मिनिटांनी वाढल्याने मेट्रोच्या काही फेर्या वाढणार असून सकाळच्या वेळेस लवकर मेट्रो गाडी उपलब्ध होणार असल्याने ही बाब प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मार्गिकेची प्रतीक्षा

मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्पा २ अ चे काम एमएमआरसीकडून अंतिम टप्प्यात आहे. हा टप्पा आॅगस्टमध्ये सुरु होईल असे सांगितले जात होते, मात्र यास विलंब झाला आहे. पण आता मात्र या मार्गिकेसाठीची सुरक्षा प्रमाणपत्रासाठीची मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या पथकाकडून एक तपासणी पूर्ण झालेली आहे.

आता मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून तपासणी, पाहणी झाल्यास या मार्गिकेला सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल आणि हा टप्पा सेवेत दाखल होईल. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार आहे. मात्र हा शेवटचा टप्पा नेमका केव्हा वाहतूक सेवेत दाखल होणार याची निश्चित तारीख मात्र एमएमआरसीकडून जाहिर केली जात नसल्याचे चित्र आहे.