मुंबई: मुंबईतील मुसळधार पावसाचा ‘मेट्रो ३’लाही फटका बसला आणि सांडपाणीनिःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे जलसंरक्षक भिंत कोसळून वरळीतील आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याची धक्कादायक घटना सोमवार, २६ मे रोजी घडली. त्यानंतर वरळी – आचार्य अत्रे चौक स्थानकांदरम्यानची मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली. मात्र डागडुजी व आवश्यक दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करून आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक स्थानकादरम्यानची सेवा शनिवार, ३१ मे रोजी दुपारी १ वाजल्यापासून पुन्हा सुरू करण्यात आली.

नियमित वेळापत्रकानुसार ‘मेट्रो’च्या फेऱ्या सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) देण्यात आली.सांडपाणीनिःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे जलसंरक्षक भिंत कोसळली आणि ‘मेट्रो ३’ मार्गावरील डॉ. ॲनी बेझंट मार्गालगतच्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन येण्या-जाण्याच्या मार्गावर पाणी शिरले. या घटनेनंतर आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात धबधब्यासारखे पाणी पडत होते. पाणी साचल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून स्वयंचलित जिनेही बंद करण्यात आले. तसेच मेट्रो स्थानकात सांडपाण्यासोबत कचरा शिरल्यामुळे मेट्रो स्थानकात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली होती.

मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भुयारी मेट्रो स्थानक मार्गिकेतील आरे – बीकेसी पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी बीकेसी – आचार्य अत्रे चौक, वरळी हा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती.

मात्र भुयारी मेट्रो स्थानकाच्या लोकार्पणानंतरच्या पहिल्याच पावसात मेट्रो सेवेचा बोजवारा उडाला. वरळीतील डॉ. ॲनी बेझंट मार्गालगतच्या आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरळी ते आचार्य अत्रे चौक स्थानकांदरम्यानची मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र आरे जेव्हीएलआर – वरळीदरम्यान मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात आली. आता दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर शनिवार, ३१ मे रोजी दुपारी १ वाजल्यापासून आरे जेव्हीएलआर – आचार्य अत्रे चौक स्थानकांदरम्यानची मेट्रो सेवा सुरू करण्यात आली.

• आरे जेव्हीएलआर – आचार्य अत्रे चौक वेळापत्रक

सोमवार ते शनिवार : सकाळी ६.३० ते रात्री १०.३०रविवार : सकाळी ८.३० ते रात्री १०:३०