मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : दिवाळीत मुंबईमध्ये सुमारे चार हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. मुंबई मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली असून, लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.
मुंबईसारख्या महागडय़ा शहरात परवडणाऱ्या किमतीत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यल्प आणि अल्प गटासाठी म्हाडा सोडत हेच एकमेव माध्यम आहे. त्यामुळे म्हाडाच्या सोडतीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले असते. म्हाडाच्या मुंबईतील सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळतो. मात्र, २०१९ नंतर मुंबईत सोडत निघालेली नाही. मुंबई मंडळाकडे सोडतीसाठी पुरेशी घरे नसल्याने आणि काम सुरू असलेली घरे सोडतीनंतर वर्षभरात ताबा देता येण्याच्या स्थितीत नसल्याने सोडत रखडली आहे. पण, आता मात्र ही सोडत मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. दिवाळीच्या दीड-दोन महिन्यांआधी जाहिरात प्रसिद्ध करून प्रत्यक्ष सोडत काढण्यात येईल. या सोडतीत पहाडी, गोरेगाव येथील तीन हजार ०१५ घरांपैकी अल्प आणि अत्यल्प गटातील दोन हजार ६८३ घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच कोळे-कल्याण, अॅन्टॉप हिल, विक्रोळी आदी ठिकाणच्या घरांचाही समावेश असणार आहे.
बांधकामाधीन प्रकल्पातील घरांचा समावेश बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करू नये, असा निर्णय म्हाडाने घेतला होता. मात्र, आता चालू प्रकल्पातील येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल अशा घरांचा सोडतीत समावेश करण्यात येईल, असे अनिल डिग्गीकर यांनी सांगितले. आता म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचे अधिकार मिळाल्याने निवासी दाखला मिळणे सोपे झाले आहे, असेही डिग्गीकर म्हणाल़े