वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच औषधशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्य सामायिक परीक्षेचा(MHT-CET) निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. परिक्षेचा केवळ विभागवार निकाल रात्री जाहीर करण्यात आला. सविस्तर निकाल आज सकाळी १० वाजता डीएमईआरच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. महाविद्यालयांनाही आजच विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी देण्यात येणार आहे.

निकाल कुठे पाहाल?-

शासनाकडून ५ मे २०१६ रोजी राज्यातील १०५४ केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेचे गुण परीक्षार्थींना http://www.dmer.org, http://www.mhcet2016.co.in, http://www.mahacet.org, http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य शासनाच्या महसूल, शिक्षण, अर्थ व गृह विभागाच्या सहकार्याने ही परीक्षा यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी १०५४ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेला राज्यभरात एकूण ४ लाख ९ हजार २७५ विद्यार्थी बसले होते.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी विदर्भातून ५८ हजार ३७० परीक्षार्थींपैकी १२ हजार २०३, मराठवाड्यातून ५५ हजार ३४ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ८९४ तर उर्वरित महाराष्ट्रातून १ लाख ६२ हजार २२३ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ७०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. टक्केवारीनुसार हे प्रमाण विदर्भात २०.९१ टक्के, मराठवाड्यात २१.६१ टक्के तर उर्वरित महाराष्ट्र १३.९९ टक्के इतके आहे.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. याविषयीची अधिसूचना संकेतस्थळावर तसेच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्राच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालक, मुंबई यांच्याकडून, तर पशुवैद्यकशास्त्र व मत्स्यविज्ञान या शाखांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र पशुवैद्यक व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याकडून प्रक्रिया राबविली जाणार आहे, असेही श्री. ओक यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mht cet results declared