मुंबई : राज्यात अधिकाधिक उद्योजक तयार व्हावेत यासाठी राज्य सरकारकडून मागील काही वर्षांपासून स्टार्टअप्सना प्राधान्य दिले आहे. त्याचधर्तीवर आता राज्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्टार्टअप्सना अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी असलेल्या गुगलचे बळ मिळणार आहे. गुगलच्या माध्यमातून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात भारतातील स्टार्टअप्सना नवीन संधी उपलब्ध होण्याबरोबरच त्यांना जागतिक ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने माहिती क्षेत्रातील अग्रगण्य जागतिक कंपनी गुगलच्या सहकार्याने महाराष्ट्रात उद्योगाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ. अपूर्व चॅमरिया यांनी मंगलप्रभात लोढा यांची नुकतीच भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी कौशल्य विभागाचे आयुक्त लहुराज माळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे बैठकीला उपस्थित होते.
जगातल्या नऊ देशात गुगलद्वारे एआय प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येत आहेत. स्टार्टअप्साठी भारतातही अशाप्रकारचे केंद्र सुरू करण्याचे गुगलकडून नियोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी डॉ. अपूर्व चॅमरिया यांनी दिली. निवड प्रक्रियेद्वारे उत्कृष्ट ठरणाऱ्या स्टार्टअप्सना यात संधी मिळणार आहे. देशात अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र ठरणार असून महाराष्ट्रातील नव्या उमेदीने उद्योग करू पाहणाऱ्या युवकांना या निमित्ताने जागतिक कवाडे उघडणार असल्याचा विश्वास यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. सध्या यासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरु असून लवकरच सामंजस्य करार होईल असेही त्यांनी सांगितले.
राज्यात सुरू होणाऱ्या स्टार्टअप्ससाठी केंद्र सुरू करण्यासाठी गुगलने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे स्टार्टअप्स सुरू करणाऱ्या तरुणांसाठी एक संधी उपलब्ध झाली आहे. मात्र त्याचबरोबर गुगलने राज्यातील आयटीआय संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम महाराष्ट्रात सुरु करण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे भविष्यात राज्यातील आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुगलमार्फत अद्ययावत प्रशिक्षण उपलब्ध होण्याचा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आयटीआय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुशल मनुष्यबळ बनविण्याच्या राज्य सरकारच्या धोरणांना चालना मिळणार असल्याचेही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.