लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : दहिसर पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर मोटरगाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या आदित्य वेलणकर (१७) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अनोळखी मोटरगाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.

तक्रारदार करण राजपूत , त्याचा मित्र आदित्य वेलणकर एका दुचाकीवरून तर पियुष शुक्ला दुसऱ्या दुचाकीवरून दहिसरहून कांदिवलीच्या दिशेने शुक्रवारी परत येत होते. करण दुचाकी चालवत होता. तर आदित्य दुचाकीवर मागे बसला होता. शैलेंद्र महाविद्यालयावळील पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाखाली जात असताना एका अज्ञात मोटरगाडीने त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाने हॉर्न न वाजवल्यामुळे त्याची मोटरगाडी दुचाकीला घासली. दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

आणखी वाचा-मुंबई : गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, महापालिकेची तयारी पूर्ण

यावेळी आदित्य रस्त्याच्या डाव्या बाजूला, तर दुचाकी रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. आदित्यच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याच्या कान आणि नाकातून रक्त येत होते, तर करणला फक्त किरकोळ दुखापत झाली. पियुष आणि करण यांनी आदित्यला कांदीवलीतील रुग्णालयात नेले. पण तेथील डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केले. दहिसर पोलिसांनी शनिवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) आणि २८१ ( निष्काळजी कृती) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.