मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘दहिसर – मिरारोड – भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकेअंतर्गत मिरारोड – भाईंदर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या द्विस्तरीय पुलाची वर्षभरातच दूरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले होते. एमएमआरडीएच्या निर्देशानुसार कंत्राटदाराने खड्डे बुजवले, पण बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून खड्डे बुजविण्यात आल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याप्रकरणी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचीही मागणीही नागरिकांनी केली आहे. त्याच वेळी तातडीने पुलाची योग्य प्रकारे दुरूस्ती करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क जंक्शन येथून ‘मेट्रो ९’ मार्गिका जात असून मेट्रो मार्गिकेखाली वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे एमएमआरडीएने येथे एक द्विस्तरीय पूल बांधला असून या पुलाचे लोकार्पण ऑगस्ट २०२४ मध्ये करण्यात आले. एक किमी लांबीचा हा पूल वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्ष होत नाही तोच त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आणि पुलाचे काम निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिकांकडून होऊ लागला. अल्पावधीतच पुलावर खड्डे पडल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झाले. त्यानंतर एमएमआरडीएने पुलाच्या दुरुस्तीचे आदेश दिले आणि कंत्राटदाराने खड्डे भरण्यास सुरुवात केली. मात्र आता महिन्याभरातच कंत्राटदाराने खड्डे बुजवण्यासाठी केवळ मलमपट्टी केल्याची बाब समोर आली आहे. बुजवलेले खड्डे पुन्हा उखडू लागले आहेत. डांबर हाताने सहज काढता येत आहे. कंत्राटदार आणि एमएमआरडीएच्या या कामावर नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबर, साहित्य वापरून खड्डे बुजविण्यात आले आहेत. पुलावर जाऊन मी स्वत: पाहणी केली. बुजवलेले खड्डे पुन्हा उखडू लागले आहेत. त्यामुळे हा कंत्राटदार आणि एमएमआरडीएचा गैरप्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी करावी आणि कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक अँड. कृष्णा गुप्ता यांनी केली आहे. याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.