मुंबई : कफ परेड-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरुन प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मासिक ट्रिप पासमध्ये सवलत देण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) घेतला आहे. मासिक ट्रिप पास आणि सवलतीची सुविधा येत्या दहा दिवसात उपलब्ध होणार आहे. बेस्ट बस, एसटीमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहेत. तर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेत ८० टक्के अपंगत्व असलेल्यांना ७५ टक्के आणि त्यांच्या मदतनीसाला ५० टक्के तिकिट दरात सवलत आहे.

दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ आणि दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेवरील प्रवासासाठीही दिव्यांगांना तिकिट दरात सवलत देण्यात आली आहे. पण नुकत्याच पूर्ण क्षमतेने धावू लागलेल्या मेट्रो ३ मध्ये दिव्यांगांना अशी कोणतीली सवलत नाही. त्यामुळे मेट्रो ३ मार्गिकेवरुन प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना तिकिट दरात सवलत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपू्र्वी करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने आता एमएमआरसीने दिव्यांगांना तिकिट दरात सवलत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एक्सवरुन (ट्विटर) दिली आहे.

मेट्रो ३ मार्गिकेवरुन प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मासिक ट्रिप पासमध्ये २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यानुसार यासाठी तिकिट प्रणालीत आवश्यक ती सुधारणा करण्याचे काम सध्या एमएमआरसीकडून सुरु आहे. हे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मासिक पास सवलतीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा यासंबंधीची माहिती लवकरच एमएमआरसीकडून दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मेट्रो ३ मार्गिकेवर अद्याप मासिक पासची सुविधा उपलब्ध नाही.

मात्र दिव्यांगांना मासिक पासमध्ये २५ टक्के सवलत देण्याच्या एमएमआरसीच्या घोषणेच्या अनुषंगाने सर्वांसाठी मासिक पास उपलब्ध करुन दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याविषयी एमएमआरसीकडे विचारणा केली असता अद्याप त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र सर्वांसाठी मासिक पास सुविधा उपलब्ध करुन दिली गेली तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे म्हटले जात आहे.