ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या आनंद नगर – साकेत उन्नत रस्ता प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक मेट्रो ३ (कुलाबा – वांद्रे – सीप्झ) मार्गिकेतील महालक्ष्मी स्थानक तसेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलासह ‘ट्रॅव्हलेटर’ अर्थात सरकत्या मार्गाने जोडण्याच्या कामाच्या निविदेलाही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता लवकरच उन्नत रस्त्याच्या आराखड्याच्या कामासह मोनो रेल्वेवरील सरकत्या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही स्पष्ट सांगितलं…”

एमएमआरडीएची कार्यकारी समितीची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यानुसार आंनद नगर – साकेत उन्नत रस्ता प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देऊन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. पूर्व द्रुतगती मार्गावरून ठाण्यात येणाऱ्या आणि पुढे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एमएमआरडीएने आंनद नगर – साकेत उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. अंदाजे १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या ६.३० किमी लांबीच्या आणि सहा (येण्यासाठी तीन, जाण्यासाठी तीन) मार्गिका असलेल्या या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी निविदा अंतिम करून सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. आता आठवड्याभरात आराखड्याच्या कामाला सुरुवात होईल, असेही श्रीनिवास यांनी सांगितले.

हेही वाचा- शिर्डीसाठी रात्रीही विमानसेवा शक्य, विमानतळावर ‘नाइट लँडिंग’ला परवानगी

या बैठकीत महालक्ष्मी मेट्रो आणि रेल्वे स्थानकाशी मोनो स्थानक सरकत्या मार्गासह पादचारी पुलाने जोडण्यासाठीच्या कामासाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीलाही मंजुरी देण्यात आल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले. चेंबूर – संत गाडगे महाराज मोनोरेल प्रकल्पातील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेल मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेशी जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक मेट्रो ३ (कुलाबा – वांद्रे – सीप्झ) मार्गिकेतील महालक्ष्मी स्थानक तसेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलासह सरकत्या मार्गाने जोडण्यात येणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि बांधकाम कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकता मार्ग उभारण्याच्या कामालाही सुरुवात होणार आहे. दरम्यान, यासाठी ६३ कोटी ६८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर ३२५ मीटर लांबीचा पादचारी पूल उभारून त्यावर २६५ मीटर लांबीचा आणि ७ मीटर रुंदीचा असा हा सरकता मार्ग असणार आहे. येथे आठ ट्रॅव्हलेटर असणार असून यावर चार उद््वाहन असणार आहेत. पहिल्या टप्प्यात महालक्ष्मी रेल्वे स्थानक आणि महालक्ष्मी मेट्रो ३ स्थानकाशी मोनो जोडल्यानंतर पुढे चेंबूर, वडाळा आणि करी रोड रेल्वे स्थानकांशी मोनो स्थानके जोडली जाणार आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर मोनो प्रकल्पातील प्रवासी संख्या वाढेल, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.