माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ट्विटरवरून निरनिराळ्या विषयांवर भाष्य करताना दिसतात. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वीच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्यात झालेलं ट्विटर वॉर महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. तसंच फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्युबवरही अमृता फडणवीस सक्रिय आहेत. त्यांच्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांना विचारलं असता “कोण अमृता फडणवीस?” असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला.
शालिनी ठाकरे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटवॉरवरून टोला हाणला. तसंच त्यांनी “कोण अमृता फडणवीस?” असा सवालही केला. यावेळी त्यांनी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या पत्नीचाही उल्लेख केला. “राजू पाटील यांच्या पत्नी खुप चांगलं काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची जास्त दखल घ्यावीशी वाटते,” असं त्या म्हणाल्या.
आणखी वाचा- काँग्रेसच्या ‘या’ महिला नेत्या मनसेच्या शालिनी ठाकरेंच्या आदर्श
“आज अनेक जण ट्विटरवर आहेत. अनेक जण रोज नवनवे ट्विट करत असतात. त्यामुळे यात काही नवं नाही,” असं त्या म्हणाल्या. यापूर्वी आदित्य ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्विटरवॉर रंगल्याचं पहायला मिळालं होतं. “कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे,” असं ट्विट अमृता यांनी केलं होतं.
(सविस्तर मुलाखत लवकरच लोकसत्ता ऑनलाइनवर)