मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांना मंगळवारी पावसाने झोडपून काढले. त्या दरम्यान अनेक भागांत झाडे, फांद्या, घरांच्या भिंती पडल्याच्या दुर्घटना घडल्या. शहर आणि उपनगरांमध्ये मिळून एकूण १०७ घटनांची नोंद महापालिकेकडे झाली. सुदैवाने त्या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली. त्याचबरोबर प्रवाशांचेही हाल झाले.

या काळात अनेक भागांत झाड, फांद्या पडल्या होत्या. दरम्यान, मंगळवारच्या मुसळधार पावसातही शहरात २७ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्या. तसेच, पूर्व उपनगरात २३ व पश्चिम उपनगरात ४३ अशा एकूण ९३ घटना घडल्या. याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेने संबंधित ठिकाणी मदतकार्य पोहोचवून फांद्या तोडण्याचे व उचलण्याचे काम सुरु केले.

तसेच, शहरात ४, पूर्व उपनगरात ७ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १४ ठिकाणी घराचा भाग, भिंत पडण्याच्या घटनांची नोंद झाली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शहर आणि दोन्ही उपनगरात मिळून ३२ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या.