मुंबई : गणेशमूर्तींच्या मिरवणुकीपुढे यंदाही १३ धोकादायक पुलांचे विघ्न आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १३ पूल धोकादायक असून, काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शिवाय, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेशभक्तांनी गणेशमूर्तींच्या आगमन – विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सव मिरवणुकांसाठी आव्हान असतात. तसेच आता मुंबईतील धोकादायक पूलही गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमधील मोठा अडथळा ठरत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून गणेशोत्सवाच्या तोंडावर धोकादायक पुलांचा विषय चर्चेत येत आहे. शहर भागातील अनेक जुने पूल ब्रिटिशकालीन असून ते धोकादायक स्थितीत आहेत. या पुलांवरून मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे आवाहन दरवर्षी करण्यात येते.

हेही वाचा – सोमवारी अंधेरी, जोगेश्वरीत अर्धा दिवस पाणीपुरवठा बंद

या १३ पुलांवर एका वेळी अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करून नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरून खाली आल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळी भाविकांनी जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरून पुढे जावे, पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, हे १३ पूल आणि पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावरील पुलांची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असून त्याकरीता निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – चतुरंग प्रतिष्ठानचा २८ – २९ सप्टेंबरला सुवर्णमहोत्सव सांगता सोहळा, विविध क्षेत्रांतील ११ मान्यवरांना गौरवण्यात येणार

हे आहेत धोकादायक पूल

मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज, करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज, आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज, शीव (सायन) स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिजवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज, प्रभादेवी – कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज आदींवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai 13 dangerous bridge disrupted during ganesh utsav a call to care during the arrival discharge procession mumbai print news ssb