मुंबई : गेल्या चार दिवसांपासून ॲप आधारित टॅक्सी-रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. मात्र कुटुंबाला संपाची झळ बसू लागल्याने हातावर पोट असलेल्या ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व ॲप आधारित सेवेसाठी लागू करण्याची प्रमुख मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईतील ॲप आधारित टॅक्सी चालकांनी प्रतिकिमी ३२ रुपयांप्रमाणे भाडे आकारून प्रवाशांना सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीओने मंगळवारपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास बुधवारपासून पुन्हा संप करण्याचा इशारा महाराष्ट्र कामगार सभा या संघटनेने दिला आहे.
ओला, उबरसारख्या ॲप आधारित टॅक्सी चालकांना प्रतिकिमी ८ ते १२ रुपये भाडे देण्यात येत होते. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व ॲप आधारित सेवेसाठी लागू करावे, अशी मागणी राज्यभरातील चालकांकडून करण्यात येत होती. यासाठी सीएसएमटीजवळील आझाद मैदानात संप आणि अनिश्चित कालावधीसाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. यादरम्यान नालासोपारा येथील एका चालकाने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्व चालक आझाद मैदानात एकवटले होते.
टॅक्सी चालक आणि आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक
ॲप आधारित टॅक्सी-रिक्षा चालक, त्यांचे नेते आणि आरटीओचे वरिष्ठ अधिकारी यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत चालकांच्या समस्या, मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. अनिश्चित भाडेदरामुळे चालकांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण होत आहे. त्यामुळे आरटीओने निश्चित केलेल्या दरानुसार भाडे ठरवावे, अशी मागणी चालकांनी केली. या मागण्यांबाबत आरटीओ विचार करून मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहे.
‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळावरील दर आकारणार
ॲप आधारित टॅक्सी-रिक्षा चालक आता ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळाचा वापर करून दर आकारणार आहेत. प्रति किमी ३२ रुपये प्रमाणे दर आकारण्यात येणार आहेत. प्रवाशांनी ओला, उबर किंवा इतर ॲपवरून टॅक्सी-रिक्षा आरक्षित केल्यानंतर, त्या ॲपवर दर्शविण्यात येणारे भाडे न आकारता, ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळावरून भाडे आकारले जाईल. ॲपवर दर्शविणारे किलोमीटर अंतर ‘ओन्ली मीटर’ संकेतस्थळावर नमुद केल्यानंतर दाखविण्यात येणाऱ्या एकूण प्रवास भाड्याची आकारणी करण्यात येणार आहे.
चालक-प्रवाशांमध्ये वादाची शक्यता
ओला, उबर ॲपवर कमी रक्कम दाखवलेली असताना जादा रक्कम आकारल्यास चालक आणि प्रवाशांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. परंतु, पुण्यात हा प्रयोग यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे. मुंबईकर प्रवासी देखील चालकांच्या सोबत असून सुरुवातीला काहीशी गैरसोय होईल. परंतु, वेळेत आणि योग्य प्रवासाला मुंबईकराचे प्राधान्य असते. त्यामुळे ‘ओन्ली मीटर’द्वारे आकारण्यात येणाऱ्या दरामुळे प्रवासी आणि चालक या दोघांचेही हित साध्य होईल,, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संपाचा इशारा
आरटीओने मागण्यांबाबत विचार करण्यासाठी मंगळवारपर्यंत वेळ मागितला आहे. मात्र, चालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी गाडी चालवणे आवश्यक आहे. त्यामुळे तूर्तास संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, मंगळवारी मागण्या पूर्ण न झाल्यास, सकारात्मक निर्णय न घेतल्यास, पुन्हा मोठ्या संख्येने चालक संपावर जातील, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.