मुंबई : गुजरातमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामे वेगात सुरू असून या प्रकल्पातील महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नद्यांपैकी एक असलेल्या साबरमती नदीवर १२ मजली इमारती इतक्या उंचीचा पूल उभारण्यात येत आहे.

साबरमती नदी अरवली पर्वतरांगामधून उगम पावते आणि अरबी समुद्रातील खंभातच्या आखाताला जाऊन मिळते. नर्मदा आणि तापी या नद्याही अशाच प्रकारे पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत. साबरमती नदीवर उभारण्यात येणारा पूल हा साबरमती आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान स्थित आहे. तो साबरमती स्थानकापासून सुमारे एक किमी आणि अहमदाबाद स्थानकापासून सुमारे चार किमी अंतरावर आहे.

पुलाची उंची किती ?

नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडने ( एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेनचे काम हाती घेतले आहे. या कामातील भाग म्हणून ३६ मीटर (सुमारे १२ मजली इमारतीइतका, अंदाजे ११८ फूट) उंच पूल अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधण्यात येत आहे.

बांधकामावर कॅमेऱ्याद्वारे लक्ष

अत्याधुनिक यंत्राचा वापर करून पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.नदीच्या प्रवाहाला कमीत कमी अडथळा यावा यासाठी पुलाची रचना नियोजनबद्ध केली आहे. हा नदी पूल आठ गोलाकार खांबावर उभा असून त्यांचा व्यास ६ ते ६.५ मीटर इतका आहे. यापैकी चार खांब नदीच्या पात्रात दोन खांब नदीच्या काठावर आणि दोन खांब नदीच्या काठाच्या बाहेर उभारण्यात आले आहेत. या पुलाच्या बांधकाम प्रक्रियेच्या देखरेखीसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पात या पुलांची उभारणी

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचसीआरसीएल) मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले असून या मार्गात एकूण २५ नदी पुलांचा समावेश आहे. यापैकी २१ गुजरातमध्ये आणि ४ महाराष्ट्रात आहेत. गुजरातमध्ये नियोजित २१ नदी पुलांपैकी १६ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील पार, औरंगा, कोलक, दारोठा, दमणगंगा नदी; नवसारी जिल्ह्यातील पूर्णा, मिंधोला, अंबिका, वेंगानिया, कावेरी, खरेरा नदी; खेडा जिल्ह्यातील मोहर, वात्रक, मेश्वा नदी; वडोदरा जिल्ह्यातील धाधरा नदी; सुरत जिल्ह्यातील किम या नद्यांवर पूल उभारण्यात आले आहेत.

पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ?

पुलाची एकूण लांबी – ४८० मीटर

नदीची रूंदी – ३५० मीटर

पुलामध्ये ७६ मीटर लांबीचे ५ स्पॅन्स आणि ५० मीटर लांबीचे २ स्पॅन्सचा समावेश

खांबांची उंची – ३१ मीटर ते ३४ मीटर

६ मीटर व ६.५ मीटर व्यासाचे ८ गोलाकार खांब