मुंबई : आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, पायाभूत सुविधा याबरोबर मुंबई महापालिकेने आता ‘तेरे मेरे सपने’ हा एक नवीनच उपक्रम सुरू केला आहे. वैवाहिक जोडप्यामध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने मुंबई महापालिकेने एक विवाह समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. भाजपच्या एका नेत्याच्या पत्नीच्या संस्थेच्या सहकार्याने हे केंद्र नुकतेच विलेपार्ले येथे सुरू करण्यात आले आहे.

आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा ही मुंबई महानगरपालिकेची मूलभूत कर्तव्ये असून गेल्या काही वर्षात मुंबई महापालिकेने मोठ्या पायाभूत सुविधा देण्यावरही लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेने आता तरुणांना वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने नुकतेच विलेपार्ले येथे एक विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरु केले आहे.

या समुपदेशन केंद्रात जोडप्यांना संवाद कौशल्य, ताणतणाव व्यवस्थापन, नातेसंबंधातील समन्वय यासारख्या बाबींसाठी मार्गदर्शन मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहरी उपजीविका केंद्र अंतर्गत या विवाहपूर्व संवाद केंद्राचा शुभारंभ विलेपार्ले येथील बाबासाहेब गावडे रुग्णालयाच्या इमारतीत करण्यात आला आहे.

या संस्थेचा सहभाग

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या माध्यमातून विलेपार्ले येथे ‘तेरे मेरे सपने’ हे ‘विवाहपूर्व समुपदेशन केंद्र’ सुरू झाले आहे. यावेळी भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वर्षा पवार – तावडे, संस्थेच्या मुंबई अध्यक्षा डॉ. प्राची मोघे, स्त्री शक्ती संस्थेच्या मनीषा चव्हाण उद्घाटनाला उपस्थित होत्या. वर्षा तावडे या भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या पत्नी आहेत.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने नुकतीच मुंबईतील विवाह नोंदणी सुविधाही ऑनलाईन केली आहे. मुंबईत दरवर्षी लाखो जोडप्यांचे विवाह होतात. मात्र त्यापैकी केवळ ३० ते ३५ हजार विवाहांचीच नोंदणी होत असते. त्यामुळे मुंबई महापालिकेने ही सुविधा दिली आहे. याआधी, महानगरपालिकेच्या कार्यालयात हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शीख, जैन धर्मीय या जोडप्यांची विवाह नोंदणी करण्यात येत होती. आता, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी यांसारख्या सर्व धर्मांच्या समान धर्मीय जोडप्यांनाही विवाह नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. शीख जोडप्यांसाठी वरील पर्याया व्यतिरिक्त, आनंद विवाह अधिनियम, १९०९ अंतर्गत नोंदणी अर्जाकरिता, आता महानगरपालिका संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे.