मुंबई : पावसाची रिपरिप आता कुठे सुरू झाली असतानाच सोमवारी मध्यरात्री कुर्ला पूर्व येथील नाईक नगर सोसायटीतील तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मध्यरात्रीच्या सुमारास मोठय़ा आवाजासह कोसळलेल्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकांची संसार गाडले गेल.

नाईकनगर सोसायटीतील रहिवासी रात्री निद्रिस्त होण्याच्या तयारीत असतानाच भूकंपासारख्या हादऱ्याने क्षणात होत्याचे नव्हते केले. काही कळण्याच्या आतच इमारत कोसळली आणि हाहाकार उडाला.  आसपासच्या रहिवाशांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. थोडय़ा वेळेतच तेथे दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सूत्रे हाती घेत बचावकार्य सुरू केले.  सोसायटीतील एक संपूर्ण इमारत कोसळली आणि दुसऱ्या इमारतीचा काही भाग कोसळण्याच्या बेतात होता. त्यामुळे बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना खूप काळजी घ्यावी लागत होती. एकेका रहिवाशाला ढिगाऱ्याबाहेर काढण्यात येत होते. जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत होते. बचावकार्य सुरू असतानाच पहाट झाली. तोपर्यंत दुर्घटनाग्रस्त रहिवाशांचे नातेवाईक आणि मित्र घटनास्थळी दाखल झाले.  सकाळ झाल्यानंतर मदतकार्य वेगाने सुरू झाले. अग्निशमन दलाचे बंब, सायरन वाजवत ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिका, माती उपसणाऱ्या जेसीबीची धडधड, वाहतूक आणि बघ्यांची गर्दी पांगविण्यासाठी सुरू असलेली पोलिसांची धडपड, ढिगाऱ्याखालून एकेका रहिवाशांची सुटका करण्यासाठी सुरू असलेली धावपळ असे लगबगीचे वातावरण नाईकनगर सोसायटीच्या आवारात होते, पण उपस्थितांची मने मात्र या दुर्घटनेने सुन्न झाली होती!

भिंतीवर झाडे

नाईकनगर सोसायटीमध्ये एकूण चार इमारती असून त्या धोकादायक अवस्थेत आहेत. या इमारती रिकाम्या करण्यात याव्या यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली होती. मात्र रहिवासी घर रिकामे करायला तयार नव्हते. इमारतीच्या भिंतीवर, संरक्षक भिंतीवर पिंपळाची झाडे उगवल्याचे दिसत आहे. संरक्षक भिंत पोखरून पिंपळाचे भले मोठे झाड उभे आहे, तर इमारतीतील स्वच्छतागृह, स्वयंपाकगृहाच्या बाहेरील भिंतीवर मध्यम आकाराची पिंपळाची रोपे उगविली होती.

वाहतूक कोंडी आणि बघ्यांचा ताप

या दुर्घटनेमुळे सकाळी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. कुर्ला स्थानकापासून एस. जी. बर्वे मार्गावर बेस्ट बस, रिक्षा, खासगी गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कुर्ला पूर्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. दुर्घटनाग्रस्त इमारत परिसरात मदतकार्य सुरू होते. दुर्घटनाग्रस्त इमारत आणि बचावकार्य पाहण्यासाठी बघ्यांनी प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाला ही गर्दी हटवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागले. दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी जाऊ द्या, अशी विनंती अनेक जण पोलिसांना करीत होते. बचावकार्य सुरू असून लवकरात लवकर नातेवाईकांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल, असा धीर पोलीस संबंधितांना देत होते.

नागरिकांना आवाहन

अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाशी १९१६/ २२६९४७२५/ २२६९४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

वाहनांचे नुकसान

रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाडय़ा ढिगाऱ्याखाली दबल्या. इमारतीचा काही भाग संरक्षक भिंत आणि लगतच्या रस्त्यावर पडला. त्यामुळे संरक्षक भिंत पडली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी ढिगाऱ्याखाली गेल्या.

चार खोल्यांत ४० मजुरांचे वास्तव्य

मुंबई : कुर्ला येथील नाईक नगर सोसायटीतील इमारतीमध्ये ४० बांधकाम मजूर वास्तव्यास होते. हे मजूर या इमारतीमध्ये वास्तव्यास राहण्यास तयार नव्हते. मात्र कंत्राटदाराने त्यांना तेथे राहण्यास भाग पाडल्याचा आरोप दुर्घटनेतून बचावलेल्या मजुरांनी केला आहे. त्यामुळे आता या कंत्राटदारावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

कुल्र्यातील बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे ४० मजूर या इमारतीत वास्तव्यास होते. यापैकी काही मजूर अनेक वर्षांपासून तेथे वास्तव्यास होते. मुंबई महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक जाहीर केल्याचे माहीत होते. त्यामुळे घर बदलण्याची मागणी आम्ही करीत होतो, परंतु कंत्राटदार ऐकण्यास तयार नव्हता. कंत्राटदार व्यवस्था करेल तेथे राहण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. शेवटी घडू नये ते घडलेच, असे १९ वर्षीय आदित्य कुशवाह याने सांगितले. इमारतीमध्ये चार खोल्यांमध्ये हे मजूर वास्तव्यास होते आणि एका खोलीसाठी १५ हजार रुपये भाडेही देत होते.

इमारत धोकादायक असतानाही तेथे मजुरांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणाऱ्या कंत्राटदारांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

पालिकेचे स्पष्टीकरण

* नाईक नगर सोसायटी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर सन १९७३ मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये ए, बी, सी व डी अशा ४ इमारती असून यापैकी पहिल्या तीन इमारती  या ५ मजली आहेत. तर ‘डी’ विंग ही चार मजली इमारत आहे.

*  सन २०१३ मध्ये २८ जून रोजी मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ३५४ नुसार सदर इमारतीला मोठय़ा दुरुस्ती कामे  करण्याची नोटीस बजावण्यात आली होती, असे पालिकेचे म्हणणे आहे.

* इमारतीमध्ये अपेक्षित दुरुस्ती कामे सदस्यांद्वारे करण्यात आली नाहीत. परिणामी सदर इमारतीवर कलम ‘४७५ ए’ नुसार कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली.

*   दुरुस्ती कामे न करण्यात आल्याने  इमारतीचा समावेश ‘सी १’ या या प्रवर्गात करण्यात आला. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम ३५४ नुसार नोटीस जारी करण्यात आली. यानुसार दि. १८ नोव्हेंबर २०१४ आणि २६ मे २०१५ रोजी ‘नाईक नगर सोसायटी’ इमारत पाडण्याची नोटीस देण्यात आली.

* १६ मे २०१६ रोजी इमारतीची जल व विद्युत जोडणी तोडण्यात आली होती. मात्र  मे. सचदेव आणि असोसिएट्स यांच्याद्वारे करण्यात आलेल्या संरचनात्मक तपासणीनुसार, ३० जून २०१६ ही इमारत ‘सी २ बी’ या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर सदर इमारतीची जल विद्युत जोडणी पूर्ववत करण्यात आली होती.

* इमारतीतील रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर इमारतीमध्ये रहात असल्याचे पत्रही पालिकेकडे सादर केले होते, असा दावा प्रशासनाने केला आहे.