Mumbai Man Lost 12 cr In Online Gaming: मुंबईतील एका स्थानिक व्यावसायिकाने ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे गमावले आहे. यामुळे हा व्यावसायिक कर्जबाजारी झाला आहे. या व्यक्तीने अनेक दशके मेहतन करून आपला व्यवसाय उभारला होता परंतु कोविड काळात तो ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकला. “मी जे काही कमावले होते, ते सर्वा मी गमावले”, असे हा व्यावसायिक म्हणाला.
इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना या व्यक्तीने सांगितले की, २०२१ मध्ये त्याला फेसबुकवर एका लोकप्रिय अभिनेत्रीची जाहिरात दिसली, ज्यामध्ये मोठ्या परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते. कोविड काळात व्यवसायात तोटा सहन करावा लागल्याने त्याने लिंकवर क्लिक केले आणि पॅरीमॅच ॲप डाउनलोड केले.
या व्यावसायिकाने सांगितले की, “सुरुवातीला, मला यामध्ये चांगला नफा मिळत होता. त्यामुळे मला ते खरे असल्याचे वाटले. त्यानंतर, ॲपशी संबंधित लोकांनी माझ्याशी थेट संपर्क साधला आणि मला मोठ्या बोनसच्या आश्वासनांसह मोठ्या ठेवी करण्यास प्रोत्साहित केले.”
या व्यावसायिकाने पुढे असा दावा केला आहे की, तीन वर्षांच्या कालावधीत, त्याने या ॲपवर सुमारे २७ कोटी रुपये जमा केले, परंतु त्याला केवळ १५ कोटी रुपये वसूल करण्यात यश आले. उर्वरित १२.२२ कोटी रुपये बुडाले. तोटा भरून काढण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आणि तो आणखी कर्जात बुडाला.
“सुरुवातीला, ते फोन करत राहिले आणि प्रोत्साहन देत राहिले. पण जेव्हा मी मोठी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणीही प्रतिसाद दिला नाही”, असा आरोपही या व्यावसायिकाने केला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना, व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर अंमलबजावणी संचालनालयने पॅरीमॅच (ऑनलाइन गेमिंग ॲप) ची देशव्यापी चौकशी सुरू केली.
मुंबई, दिल्ली, कानपूर, नोएडा, जयपूर, सुरत, मदुराई आणि हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये अलिकडेच टाकलेल्या छाप्यांद्वारे त्यांचे ११० कोटी रुपये गोठवण्यात आले होते.
ईडीच्या मते, पॅरीमॅच नेटवर्क सायप्रसमधून काम करणाऱ्या एका युक्रेनियन नागरिकाद्वारे चालवले जाते आणि कंपनीची नोंदणी कुराकाओ येथे आहे.
तपास संस्थांना फसव्या खात्यांशी संबंधित १,२०० हून अधिक क्रेडिट कार्ड देखील सापडले आहेत. ज्यांचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात असल्याचा आरोप आहे. फक्त एका आर्थिक वर्षात, पॅरीमॅचने संशयास्पद भारतीय युजर्सकडून ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कमावल्याचा संशय आहे.