मुंबई शहरात दिवसेंदिवस पायाभूत सोयी-सुविधांचा प्रश्न गंभीर होत आहे. रोजगाराच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक शहरात येत असतात. त्याचा ताण शहराच्या व्यवस्थेवर होताना दिसतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा सामना सामान्य माणूस करतच असतो. आता खुद्द राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही शहराच्या बकाल अवस्थेवर भाष्य केले आहे. मुंबईत शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना सुजाता सौनिक म्हणाल्या की, मुंबई शहरात सध्या पायी चालणे किंवा सायकल चालविणे कठीण झाले आहे. मुंबई शहर हे पादचाऱ्यांसाठी आता अनुकूल राहिलेले नाही. याबद्दल आपण भविष्यात कसे नियोजन करायचे, हा आपल्यासमोरील मोठा प्रश्न आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या सर्वोच्च नोकरशाह असलेल्या सुजाता सौनिक यांनी शाश्वत आणि सर्वसमावेशी शहर बनविण्याच्या दिशेने आपले प्रयत्न असले पाहिजेत, असेही म्हटले. जर आपण असे शहर बांधू शकत नाही, तर कमीत कमी असे शहर असण्यासाठी नियोजन तरी करायला हवे. अक्षय ऊर्जा आणि हरित पट्टा या दोन्ही गोष्टी शहर नियोजनचा भाग असल्या पाहिजेत.

सुजाता सौनिक यांच्या या टिप्पणीला दुजोरा देताना वॉकिंग प्रोजेक्टचे समन्वयक वेदांत म्हात्रे म्हणाले की, आपण पदपथांना आता जवळपास हद्दपारच केले आहे. नवे इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहत असताना त्यात पथपथांचा विचारही केला जात नाही. वेदांत म्हात्रे यांची संस्था चालण्यासाठी सुरक्षित आणि आनंदी वातावरण तयार व्हावे, यासाठी काम करत आहे.

समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता

याच कार्यक्रमात फ्रांसचे राजदूत थियरी मॅथौ यांनीही आपले विचार मांडले. मुंबई शहरासमोर असलेली पर्यावरणीय आव्हानांकडेही लक्ष दिले गेले पाहीजे. मुंबई हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले शहर आहे. पुढील ५० वर्षांत समुद्राच्या पातळीत अंदाजे १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनाऱ्या लगत असलेली जमीन समुद्र गिळंकृत करू शकतो, त्यादृष्टीने आतापासूनच नियोजन झाले पाहीजे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai city not very walkable and bikeable maharashtra chief secretary sujata saunik raises concern kvg