मुंबई: विक्रोळी परिसरात महापुरुषांच्या फलकावर अनधिकृतरित्या फलक लावण्यास विरोध करणाऱ्या रिक्षा चालकाच्या घराला काही अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचे उघडकीस आले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस अधिक तपास करीत आहेत. विक्रोळीमधील पार्कसाईट परिसरातील वर्षांनगर येथे मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली.
काही वर्षांपूर्वी या परिसरातील चौकाला एका महापुरुषाचे नाव देण्यात आले होते. त्याबाबतचा एक लोखंडी फलक तेथे लावण्यात आला होता. काही आज्ञात व्यक्तींनी या फलकावरच अनधिकृतरित्या सणाचे बॅनर्स लावले होते. ही बाब सदर रिक्षा चालकाच्या लक्षात आली. त्याने तत्काळ ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आणि बॅनर्स हटवण्याची मागणी केली. यावेळी काही तरूणांनी रिक्षा चालकाबरोबर वाद घातला.
मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. मात्र काही कालावधीनंतर अज्ञात व्यक्तींनी रिक्षा चालकाच्या घराला आग लावली. सुदैवाने घरातील सदस्यांनी तत्काळ आग विझवली. त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी रिक्षा चालकाने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.