मुंबई : फक्त सणासुदीच्या काळात मुंबईत येऊन चोरी करणारे चोर यंदा वेळेआधीच सक्रिय झाले आहेत. मुंबईत गणेशमूर्तींच्या आगमनाच्या वेळी झालेल्या गर्दीत या चोरांनी ‘हाथ की सफाई’ करून मोठ्या प्रमाणावर मोबाइल लंपास केले. गर्दीत मोबाइल चोरीच्या ६४ घटना, तर सोनसाखळी चोरीच्या चार घटना घडल्या.
शहरात चोरांच्या विविध टोळ्या सक्रिय आहेत. परराज्यातील कुख्यात चोराच्या टोळ्या मुंबईत येऊन चोरी करतात. काही टोळ्या मुंबईत फक्त उत्सव आणि सणासुदीच्या काळात चोरी करण्यासाठी येतात. सणासुदीला होणाऱ्या गर्दीत मिसळून सोनसाखळी चोरी आणि मोबाइल फोन लंपास करतात. मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात मोठी गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेऊन चोर मोठ्या प्रमाणावर चोरी करतात. त्यामुळे ते हमखास सणासुदीच्या काळात मुंबईत येतात. अशा चोरांना ‘फेस्टीवल चोर’ म्हटले जाते.
गणेश आगमनाच्या वेळी मोबाइल चोरी
गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपात आणल्या जात आहेत. मुंबईच्या लालबाग आणि काळाचौकी परिसरात मोठी गणेश मंडळे असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. सध्या गणेश आगमनाच्या मिरवणुका काढण्यात येत आहेत. या आगमन मिरवणुकीच्या गर्दीत फेस्टीवल चोर सक्रिय झाले आहेत. रविवारी काळाचौकी आणि लालबाग परिसरात रविवारी तब्बल ३० ते ३५ गणपतींच्या आगमन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. भोईवाडा आणि काळाचौकी पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीचे तब्बल २० गुन्हे दाखल झाले असून ६४ मोबाइल चोरीला गेले आहेत. यापैकी ५ आरोपींना अटक करून सहा मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय सोनसाखळी चोरीच्या चार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी एकूण पाच ड्रोनही जप्त करण्यात आले आहेत.
चोरांना रोखण्यासाठी मोठा बंदोस्त ठेवणार
दरवर्षी मुंबईत सणासुदीच्या काळात भुरटे चोर, तसेच चोरांच्या टोळ्या येत असतात. यंदा आगमन मिरवणुकीत हे चोर शिरले आहेत. रविवारी मुसळधार पाऊस कोसळत असतानाही मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. त्या गर्दीत चोरांनी संधी साधून नागरिकांचे मोबाइल लंपास केले, असे पोलिसांनी सांगितले. पुढील काही दिवस शहरात उत्सवाचे वातारण असणार आहे. लाखोंच्या संख्येने भाविक मुंबईत ठिकठिकाणी येतील. या कालावाधीत या फेस्टीवल चोरांना रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे पोलिसांनीही रेल्वे स्थानक परिसरातील गर्दीत होणारी चोरी रोखण्यााठी विशेष पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.