मुंबई : कोणतेही संकट वा अणीबाणीच्या प्रसंगी महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल खंबीरपणे उभे राहते. आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई अग्निशमन दल सदैव वचनबद्ध आहे. मोनोरेलमधील ५८२ प्रवाशांची यशस्वी सुटका करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाची कामगिरी प्रत्येक मुंबईकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी काढले.

चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान, म्हैसूर कॉलनीजवळ मंगळवारी सायंकाळी मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ५८२ प्रवासी अडकून पडले. परिणामी, प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी अपार धाडस, समयसूचकता आणि कौशल्य दाखवत एकूण ५८२ प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या कामगिरीबद्दल मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक होत आहे. याचबरोबर भूषण गगराणी यांनी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांचे बुधवारी कौतुक केले.

मुंबई अग्निशमन दलाचे जवान प्रशिक्षित व अनुभवी आहेत. विविध संकटे आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ योग्य योजना आखून ती अचूक व यशस्वीपणे अंमलात आणण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. मोनोरेलमधील प्रवाशांची सुटका ही केवळ मोहीम नव्हती, तर ती संपूर्ण मुंबईकरांच्या मनात आत्मविश्वास व धीर निर्माण करणारी उल्लेखनीय घटना आहे. सर्व यंत्रणांनी आपापसांत समन्वय राखल्याने मोनो रेलची स्थिती यशस्वी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.