मुंबईः सरकारी नोकरी व बदलीचे आमिष दाखवून अनेकांची ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी धुळे, नाशिक व वाशी येथील रहिवासी असून त्यांनी बनावट नेमणूक पत्र देऊन तक्रारदारांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तक्रारदार महिला (४८) कामगार रुग्णालयात कार्यरत आहे. १५ जानेवारी २०२२ पासून ही फसवणूक सुरू आहे. आरोपींनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये तक्रारदार महिलेची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारी नोकरी व बदलीचे आमिष दाखवले. त्यामुळे तक्रारदार महिला व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींवर विश्वास ठेवला. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्यांना बनावट नेमणूक पत्र देऊन त्यांच्याकडून ९८ लाख रुपये घेतले.
पण आरोपींनी दिलेले नेमणूकपत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाले. अखेर तक्रारदार महिलेने याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.