वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ या मार्गावरील मेट्रो आता उशीरापर्यंत धावणार असून शनिवारपासून (६ ऑगस्ट) शेवटची गाडी रात्री ११.४४ वाजता सुटणार आहे. तसेच वर्सोव्यावरून रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची गाडी शनिवारपासून ११.१९ वाजता सुटेल अशी माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) देण्यात आली आहे.

करोना काळात २२ मार्च ते १८ ऑक्टोबर २०२० दरम्यान २११ दिवस मेट्रो सेवा बंद होती. १९ ऑक्टोबर २०२० पासून मेट्रो सेवा सुरू झाली मात्र करोनाचे संकट लक्षात घेता मेट्रो सेवेचा कालावधी आणि फेऱ्या कमी ठेवण्यात आल्या. जसे करोनाचे संकट कमी होत गेले तसे टप्प्याटप्प्याने एमएमओपीएलने वेळ आणि फेऱ्या वाढविल्या. करोनाचे सर्व निर्बंध हटल्यानंतर करोना काळातील वेळ पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आता अखेर मेट्रो सेवा पूर्ववत झाली आहे. आता मेट्रोची सेवा सकाळी साडेसहा ते रात्री १२.०७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

एमएमओपीएलने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत घाटकोपरवरून रात्री ११.२५ मिनिटांनी शेवटची गाडी सुटत होती. आता मात्र शनिवारपासून रात्री ११.४४ मिनिटांनी शेवटची गाडी सुटणार आहे. तसेच वर्सोव्यावरून रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची गाडी आता शनिवारपासून रात्री ११.१९ ला सुटणार आहे. घाटकोपरवरून रात्री ११.४४ ला निघालेली गाडी वर्सोवा स्थानकात रात्री १२.०७ ला पोहचणार आहे. त्यामुळे १२ च्या आत बंद होणारी मेट्रो सेवा आता १२ नंतर बंद होणार आहे. मात्र त्याचवेळी सकाळच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकानुसार वर्सोवा आणि घाटकोपरवरून सकाळी ६.३० वाजता पहिली गाडी सुटणार आहे.