मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून अखेर बुधवारी अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार यंदा २० इमारतींचा या यादीत समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे २० पैकी चार इमारती या मागील वर्षीच्या यादीतील आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी दक्षिण मुंबईतील १४ हजार उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळ्याआधी सर्वेक्षण केले जाते. तर या सर्वेक्षणाच्या आधारावर अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. १५ मे पर्यंत ही यादी जाहीर करत मेच्या शेवटच्या आठवड्यात यादीतील इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा बजावत इमारती रिकाम्या करून घेतल्या जातात. जेणेकरून पावसाळ्यात इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये. असे असताना यंदा १५ मेची तारीख उलटून गेली तरी दुरुस्ती मंडळाकडून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली नाही. यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने बुधवारी प्रसिद्ध केले. यानंतर दुरुस्ती मंडळाला जाग आली आणि बुधवारी सायंकाळी मंडळाकडून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार यंदा २० इमारती अतिधोकादायक ठरल्या आहेत. या २० इमारतींमध्ये चार इमारती या मागील वर्षीच्या यादीतील आहेत.

हेही वाचा – मुंबई : स्वच्छ केलेल्या नाल्यांमध्ये पुन्हा तरंगता कचरा, नाल्यांमध्ये कचरा न टाकण्याचे पालिकेचे आवाहन

अतिधोकादायक इमारतींच्या यादीतील २० इमारतींमध्ये ४९४ निवासी आणि २१७ अनिवासी असे एकूण ७११ रहिवासी आहेत. त्यामुळे या रहिवाशांना संक्रमक शिबिरात वा इतरत्र स्थलांतरीत करत इमारती रिकाम्या करून घेण्याचे आव्हान दुरुस्ती मंडळासमोर असणार आहे. त्यानुसार आतापर्यंत ३६ निवासी रहिवाशांनी स्वतःची निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत ४६ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरु, रहिवाशी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळाकडून सुरू आहे. तसेच ४१२ निवासी रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करावे लागणार आहे. यासाठीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दुरुस्ती मंडळाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ११ जूनला ई लिलाव

अतिधोकादायक इमारती अशा:-

१) इमारत क्रमांक ४-४ ए, नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)

२) इमारत क्रमांक ५७ निझाम स्ट्रीट

३) इमारत क्रमांक ६७, मस्जिद स्ट्रीट

४) इमारत क्रमांक ५२–५८, बाबु गेणु रोड,

५) इमारत क्रमांक ७ खंडेराव वाडी/ २०४–२०८, काळबादेवी रोड

६) इमारत क्रमांक ५२ -५२ अ, २ री डेक्कन क्रॉस रोड

७) इमारत क्रमांक १२५–१२७ ए, जमना निवास, खाडीलकर रोड, गिरगांव

८) इमारत क्रमांक ३१४ बी, ब्रम्हांड को ऑप हौ सोसायटी, व्ही पी.रोड, गिरगाव

९) इमारत क्रमांक ४१८–४२६ एस.व्ही.पी रोड,(१२४ ते १३४ए ) गोलेचा हाऊस,

१०) इमारत क्रमांक ८३ – ८७ रावते इमारत, जे.एस.एस.रोड, गिरगांव

११) इमारत क्रमांक २१३–२१५ डॉ. डी.बी. मार्ग,

१२) इमारत क्रमांक ३८–४० स्लेटर रोड,

१३) ९ डी चुनाम लेन,

१४) ४४ इ नौशीर भरुचा मार्ग,

१५) १ खेतवाडी १२ वी लेन,

१६) ३१सी व ३३ए, आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग , गिरगाव चौपाटी ( मागील वर्षीच्या यादीतील) १७) इमारत क्रमांक १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग ( मागील वर्षीच्या यादीतील)

१८) इमारत क्रमांक ५५-५९–६१–६३–६५ सोफीया झुबेर मार्ग,

१९) इमारत क्र. ४४-४८, ३३-३७ व ९-१२ कामाठीपुरा ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डींग,

२०) अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस – ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, उपकर क्र ग उत्तर ५०-९५ (१) आणि ग उत्तर -५१०३ आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai kher mhada announced the list of dangerous cessable buildings this year 20 buildings are extremely dangerous mumbai print news ssb