Mumbai Kidnapper Dead: मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली. तसेच रोहित आर्यने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या वतीने अद्याप यावर अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

चांदिवली येथील रॉ स्टुडिओ नावाच्या एका बंदिस्त इमारतीत आरोपीने १५ वर्षांखालील १७ मुलांना वेबसीरीजचे ऑडिशन घेण्याच्या नावाखाली बोलावले होते. मात्र आज दुपारी त्यांना जेवणासाठी बाहेर पाठविण्याऐवजी सर्वांना डांबून ठेवण्यात आले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पवई पोलीस, साकीनाका पोलीस व अग्निशमन दलाने या मुलांची सुटका केली.

व्हिडीओ प्रसिद्ध करून केल्या होत्या मागण्या

दरम्यान मुलांना ओलीस ठेवल्यानंतर रोहित आर्य नामक इसमाने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. यात तो म्हणाला, “आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली आहे. मी काही मुलांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले आहे. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. माझे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं हवी आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे. त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यावर जी उत्तरे मिळतील त्यावर प्रतिप्रश्न विचारायचे आहेत. त्याशिवाय मला काहीच नको. मी कोणी दहशतवादी नाही. माझी पैशांची मागणी देखील नाही.”

पोलिसांच्या गोळीबारात छातीत दुखापत

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यच्या छातीला दुखापत झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी म्हटले की, प्रथमदर्शनी, मुलांना ओलीस ठेवण्यामागे काही प्रलंबित कामामधील थकबाकी कारणीभूत असल्याचे दिसत आहे. दुपारी १.४५ वाजता या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर पवई येथे पोलिसांचे पथक पोहोचले आणि त्यांनी मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.

कोण आहे रोहित आर्य?

रोहित आर्य हे स्वच्छता अभियानाचे प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगत असत. त्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित लेट्स चेंज नावाचा लघुपट केला होता. त्याचे गुजरातमध्ये प्रदर्शन करून २०१३ मध्ये गुजरातमध्ये त्याचे ही मोहीम त्यांनी सुरू केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रकल्पाची संकल्पना आवडल्याने त्यांनी गुजरातमध्ये तो राबवण्याचे आदेश दिले होते, असा दावाही रोहीत आर्य यांनी यापूर्वी वारंवार केला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करावे अशी त्यांची संकल्पना होती.