मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो मार्गिका ९ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने आरे ते कफ परेडदरम्यान धावू लागली आहे. या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने व्हॉटसअॅप तिकीट सेवा सुरु केली आहे. या सेवेला सुरुवात झाली असून आता प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार आहे. प्रवाशांना यासाठी कोणतेही स्वतंत्र अॅप डाऊनलोड करावे लागणार नाही. त्यांच्या व्हाॅटसप खात्यावरुनच त्यांना थेट तिकीट खरेदी करता येणार आहे.

एमएमआरसीच्या ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा आॅक्टोबर २०२४ मध्ये, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ तर आचार्य अत्रे चौक ते कफ परेड टप्पा नुकताच ९ सप्टेंबरला सेवेत दाखल झाला आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण मुंबई उपनगरांशी जोडली गेली असून चर्चगेट, सीएसएमटी, गिरगाव, काळबादेवी, विधानभवन, महालक्ष्मी येथे पोहचता येऊ लागल्याने या मार्गिकेला मुंबईकरांची पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत आहे.

प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने आता एमएमआरसीने व्हाॅटसॲप तिकिट सेवा सुरु केली आहे. पीलोकल फिन्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेस सुरुवात झाली आहे. व्हाॅटसअप तिकिटाच्या सुविधेमुळे आता तिकीटासाठी प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यांचा वेळ आता वाचणार आहे. तिकीटासाठी लागणाऱ्या सुट्ट्या पैशांचीही अडचण दूर होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना कोणतेही स्वतंत्र अॅप डाऊनलोड करावे लागणार नाही.

प्रवाशांना ९१ ९८७३०१६८३६ या क्रमांकावर इंग्रजीत “Hi” हा संदेश पाठवावा लागेल. अन्यथा स्थानकावरील क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढता येईल. एमएमआरसीने प्रवाशांसाठी व्हाॅटसअप तिकीटाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. मात्र मेट्रो ३ मार्गिकेत अद्यापही मोबाईल नेटवर्क नाही. एमएमआरसी आणि मोबाईल कंपन्यांमधील वाद अद्याप न मिटल्याने मोबाईल नेटवर्कचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारात शिरण्यापूर्वीच व्हाॅटसअप तिकिट खरेदी करावे लागेल किंवा स्थानकावरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.

दरम्यान प्रवाशांचा प्रवास सुलभ, सुकर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच भाग म्हणून व्हाॅटसअॅप तिकीट सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली.