मुंबई : ‘कुलावा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिका गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली असून गुरुवारी सकाळई ५.५५ वाजता कफ परेडवरून पहिली मेट्रो गाडी सुटली. पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने मेट्रो धावणार असल्याने आणि आरे – कफ परेड दरम्यान मेट्रो प्रवास सुरू होणार असल्याने मुंबईकर उत्सुक होते. गुरुवारी सकाळी मेट्रो ३ मार्गिकेवर बर्यापैकी गर्दी होती. त्यामुळेच गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत ९७ हजार ८४६ प्रवाशांनी प्रवास केला असून रात्री १०.३० पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याने दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखापार जाण्याची शक्यता आहे.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेची बांधणी केली असून या मार्गिकेचे संचलनही एमएमआरसीकडूनच केले जाते. ऑक्टोबर २०२४ मध्ये या मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा, तर मे २०२५ मध्ये बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक – कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून मेट्रो ३ गुरुवारी सकाळपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. सकाळी ५.५५ वाजता कफ परेड आणि आरे मेट्रो स्थानकावरून पहिली गाडी सोडण्यात आली.

गुरुवारी पहिल्यांदाच आरे – कफ परेड दरम्यान मेट्रो धावली. भुयारी मेट्रो मार्गाने पहिल्यांदाच गिरगाव, काळबादेवी, महालक्ष्मी, चर्चगेट, सीएसएमटी, विधान भवन, कफ परेड येथे जाता येत असल्याने मुंबईकरांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे सकाळी गर्दीच्या वेळेस अनेक मेट्रो स्थानकांवर बऱ्यापैकी गर्दी होती. दुपारी गर्दी काहीशी कमी झाली. मात्र कार्यालये सुटल्यानंतर सायंकाळी ६ पासून पुन्हा स्थानकांवर गर्दी होऊ लागली. पहिल्या दिवशी या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. मेट्रो ३ मधून गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत ९७ हजार ८४६ प्रवाशांनी प्रवास केला.

आरे – आचार्य अत्रे मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी ७० हजार होती. पण आता ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्याने प्रवासी संख्या वाढली असून आता दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मेट्रो ३ मधून सायंकाळी ६ पर्यंत ९७ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून मेट्रो ३ मार्गिकेवरील सेवा १०.३० पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखांचा टप्पा पार करणार असल्याचे चित्र आहे. हा प्रतिसाद चांगला असल्याचे म्हणत यापुढे या मार्गिकेवरील प्रवासी संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा एमएमआरसीने व्यक्त केली आहे.