मुंबई : मध्य रेल्वेवरील ३६ तासांचा जम्बो ब्लॉक संपून काही तास उलटल्यानंतर सोमवारी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे कार्यालयात निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, पश्चिम रेल्वे विलंबाने धावू लागल्यामुळे बोरिवली स्थानक, कुरार आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे ‘मेट्रो २ ए’ आणि ‘मेट्रो ७’ वर चार अतिरिक्त मेट्रो ट्रेन चालविण्यात आल्या.

बोरिवली रेल्वे स्थानकात केबल तुटल्याने पश्चिम रेल्वे वाहतूक विलंबाने धावत आहे. बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत. केबल तुटल्याने बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ वरील सेवा ठप्प झाली आहे. दरम्यान, बोरिवली स्थानक, कुरार आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. परिणामी, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी अतिरिक्त मेट्रो गाड्या चालविण्याच्या सूचना दिल्या. सध्या ‘मेट्रो मार्ग २ ए’ आणि ‘मेट्रो ७’वर चार अतिरिक्त मेट्रो ट्रेन सोड जोडण्यात आल्या.पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत होईपर्यंत मेट्रोच्या या मार्गिकांवर अतिरिक्त मेट्रो ट्रेन चालविण्यात येतील, असे असे सांगण्यात आले. तसेच गर्दीच्या वेळी सामन्यत: २१ ट्रेन चालविण्यात येतात, परंतु आज सकाळपासून एकूण २४ ट्रेन सेवेत आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई, ठाणे परिसरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत असल्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक ३,४,५,६,७ आणि ८ वरून गाड्या धावत आहेत.