मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवर धावणारी मोनोरेल गाडी सोमवारी सकाळी तांत्रिक कारणामुळे बंद पडली. जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल गाडी बंद पडली असून या गाडीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. ही गाडी अद्याप रुळावर असल्याने मोनोरेलची सेवा विस्कळीत झाली आहे.

मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून सोमवारी सकाळी पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.अशात मोनोरेल मार्गिकेवर मोनोरेल गाडी बंद पडण्याची घटना पुन्हा घडली आहे. सकाळी जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल गाडी बंद पडली आहे. तांत्रिक कारणामुळे गाडी बंद पडली आहे. या गाडीतील प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढत दुसर्या मोनोरेल गाडीने नजीकच्या स्थानकावर नेण्यात आले आहे. दरम्यान आॅगस्टमध्ये दोन मोनोरेल गाड्या बंद पडल्या होत्या. त्यातील एक गाडी दुसर्या मोनोरेल गाडीने खेचून नेण्यात महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाला (एमएमएमओसीएल) यश न आल्याने तब्बल दीड तास प्रवासी गाडी अडकले होते.

अनेकांना यावेळी श्वास घेण्याचा त्रास झाला होता. मात्र अग्निशमन दलाने सतर्कता दाखवत गाडीचा दरवाजा तोडून ५८८ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले होते. अग्निशमन दलामुळे मोठी दुर्घटना त्यावेळी टळली होती.या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन उच्च पदस्थ अधिकार्यांना निलंबित केले असून या घटनेची चौकशी सुरु आहे.

अशात सोमवारी पुन्हा मोनोरेल बंद पडली असता एमएमएमओसीएलने काळजी घेत तात्काळ अग्निशमन दलाही बोलावले होते. तर प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यास प्राधान्य दिले.प्रवाशांना बाहेर काढण्यात एमएमएमओसीएलला यश आले असले तरी गाडी मात्र अजूनही खेचून कारशेडला नेण्यात आलेली नाही. गाडी त्याच ठिकाणी उभी असल्याने मोनोरेल सेवा विस्कळीत झाली आहे.