मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी नाल्यांंमधून तरंगता कचरा काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांनी २५.२५ मेट्रिक टन तरंगत्या कचऱ्याचे संकलन करून नाले मोकळे केले. एकूण ७३ संयंत्रे, ७३५ मनुष्यबळ व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेची कार्यवाही केली. मुंबईत १३ ऑक्टोबरपर्यंत ही विशेष मोहीम सुरू राहणार आहे.
महानगरपालिकेतर्फे नालेसफाई केल्यानांतरही मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगराच्या विविध परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तरंगता कचरा जमा झाला होता. त्यामुळे पुन्हा नाले तुंबण्याची स्थिती निर्माण झाल्याने महानगरपालिकेने सोमवार, २९ सप्टेंबर ते सोमवार, १३ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नालेसफाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. विभागीय पातळीवर ही मोहीम राबविण्यात येत असून नाल्यांमधील तरंगता कचरा संकलित करणे व त्याची विल्हेवाट लावणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय विभागात सोमवारपासून विशेष स्वच्छता मोहिमेस सुरूवात करण्यात आली. सर्व विभागांमध्ये ही मोहीम सुरू राहणार आहे. या अंतर्गत सोमवारी सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून मोहीम राबविण्यात आली. एकूण ७३५ कामगार – कर्मचाऱ्यांनी ७३ संयंत्राच्या सहाय्याने स्वच्छतेची कामगिरी केली. जेसीबी,डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर आदी विविध वाहने आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती. प्रत्येक प्रशासकीय विभागातील प्रमुख नाल्यांचे (कांदळवन क्षेत्र वगळून) तसेच, नाल्याभोवतालचा परिसर, उघडी गटारे यातील कचऱ्याचे संकलन करण्यात आले. त्यासमवेतच, झाडलोट, टाकाऊ वस्तू हटवून, कचरा संकलन करून संपूर्ण परिसर स्वच्छ धुऊन काढण्यात आला. पर्जन्य जलवाहिनी विभागाने काढलेल्या तरंगत्या कचऱ्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून लावण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे मनुष्यबळ, स्वयंसेवी संस्थांचे कामगार, तसेच नागरिकांचा सक्रिय सहभागातूनपुढील १४ दिवस दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष मोहीम राबविली जाणार असल्याचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी नमूद केले.