मुंबई : मलबार हिल परिसरातील निसर्ग उन्नत मार्ग मुंबईकरांच्या पसंतीस उतरत असून दर महिन्याला हजारो पर्यटक तेथे भेट देत आहेत. निसर्ग उन्नत मार्गावर जाण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट नोंदणी करावी लागते. मात्र, ही प्रक्रिया काही प्रमाणात वेळखाऊ आहे. तसेच, अनेकांना ऑनलाईन तिकीट नोंदणी करण्यात अडचणी येतात. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी व्हॉट्स ॲपवरूनही तिकीट नोंदणी सुरु करण्याचे नियोजन पालिका करत आहे. याबाबत महापालिकेकडून तांत्रिक गोष्टींचा अभ्यास सुरु असून लवकरच ही प्रणाली सुरु होण्याची शक्यता आहे.
सिंगापूर येथील ‘ट्री टॉप वॉक’च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये खर्चून निसर्ग उन्नत मार्ग विकसित केला आहे. हा मार्ग ३० मार्च रोजी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पहिल्याच दिवशी तब्बल १ हजार ५३ मुंबईकरांनी या मार्गाला भेट दिली. मुंबईसारख्या प्रचंड वर्दळीच्या शहरात गर्द हिरवी झाडी, पक्षांचा किलबिलाट आणि निसर्गाचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी यानिमित्ताने मुंबईकरांना मिळत आहे.
फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान या ठिकाणी महापालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ४८५ मीटर लांब आणि २.४ मीटर रुंद लाकडी मार्गावरून चालताना निसर्गाच्या किमयेचा भन्नाट अनुभव घेण्यासाठी दर महिन्याला हजारो पर्यटक तेथे भेट देत आहेत.
विविध प्रजातींच्या शेकडो वनस्पती, झाडे, निरनिराळे पक्षी, सरपटणारे प्राणी न्याहाळताना एका पॉईंटवरून गिरगांव चौपटीचेही विहंगम दृश्य पाहता येते. या मार्गाला भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकीट नोंदणी करणे आवश्यक असून एका वेळी केवळ २०० पर्यटकांना या मार्गावर प्रवेश दिला जातो. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग पर्यकांसाठी खुला ठेवण्यात येतो. एप्रिल महिन्यात ५१ हजारांहून अधिक पर्यटकांनी तेथे भेट दिली होती.
निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध असून भारतीय नागरिकांकडून २५ रुपये, तर परदेशी नागरिकांकडून १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन तिकिट नोंदणीतून प्राप्त झालेल्या बारकोडच्या सहाय्यानेच पर्यटकांना या मार्गावर प्रवेश दिला जातो. मात्र, ही नोंदणी प्रक्रिया वेळखाऊ ठरते, तर काहींना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचे पालिकेने ठरवले आहे.
व्हॉट्स ॲपवरूनही तिकीट नोंदणी करता यावी यासाठी विविध बाबींची पडताळणी सुरु आहे. ही प्रणाली तयार झाल्यानंतर नवीन व्हॉट्सॲप नंबर दिला जाईल. तसेच, एकाच वेळी भेट देणाऱ्या २०० पर्यटकांची संख्या कायम राहील, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
निरनिराळे पक्षी न्याहळण्याची संधी
निसर्ग उन्नत मार्गावरून गुलमोहर, बदाम, जांभूळ, कांचन, ताड, फणस, रतन गुंज, सीता अशोक, अर्जुन, मुचकुंद, सप्तपर्णी, करमळ, विलायती शिरीष आदी प्रजातींचा झाडे पाहता येतात. तसेच, पक्ष्यांमध्ये अनेक वेळा कोकीळ, ताडपाकोळी, घार, भारतीय राखी धनेश, खंड्या, तांबट, टोपीवाला पारवा, पोपट, हळद्या, नाचण/नाचरा/नर्तक, कावळा, शिंपी चिमणी, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, साळुंकी, दयाळ, चिमुकला फुलटोचा, जांभळ्या पाठचा सूर्यपक्षी, शुभ्रकंठी, ठिपकेवाली मनोली आदी पक्षी पाहण्याची संधी मिळते. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सरडा, झाडसरडे, भारतीय सुळेदार सरडा, नाग, अजगर, नानेटी आदींचा समावेश आहे.