लग्नास नकार दिल्याचा राम मनात ठेवून प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने मनीष ठाकूर (२८) या नौदल अधिकाऱ्याला दोषी ठरविले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये काम करणाऱ्या कौशुंबी हिच्याशी मनीषचे प्रेमसंबंध होते. मात्र मनीष हा विवाहित असल्याचे कौशुंबीला समजले. त्यानंतर तिचे मनीषशी सतत भांडण होत असे आणि तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पुढे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले तसेच त्याचे दूरध्वनीही ती घेईनाशी झाली. या मुळे चिडलेल्या मनीषने तिची गोळ्या झाडून हत्या केली होती. कौशुंबीचा मृतदेह अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये सापडला होता. हत्या केल्यानंतर तो गोव्याला पळून गेला होता. मुंबई पोलिसांनी त्याच्या मागावर राहून त्याला २००७ मध्ये अटक केली होती. हत्येच्या दिवशी कौशुंबीला त्याने हॉटेलवर भेटायला बोलाविले आणि तिची हत्या केली, असा आरोप मनीषवर ठेवण्यात आला होता.

लाचखोर पोलिसाविरोधात गुन्हा
मुंबई : अटक टाळण्यासाठी पाच लाख रुपये आणि टिसॉट कंपनीचे महागडे घडय़ाळ लाच म्हणून मागणाऱ्या पोलिसावर मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण असे त्याचे नाव असून ते वर्सोवा येथे कार्यरत आहेत.फिर्यादीच्या वडिलांवर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्याकडे होता. या प्रकरणात अटक करणार नाही आणि अटकपूर्व जामीन मिळवून देऊ, असे चव्हाण यांनी सांगितले. या मोबदल्यात सुरवातीला त्यांनी फिर्यादीकडून चारचाकी गाडीची मागणी केली. नंतर ५ लाख रुपये रोख आणि टिसॉट कंपनीच्या घडय़ाळाची मागणी केली. २८ फेब्रुवारी रोजी चव्हाण फिर्यादीसोबत वांद्रे येथे घडय़ाळ घेण्यासाठी गेले होते. परंतु दुकान बंद ते घेता आले नाही. पण पाच लाख रुपये घेण्यासाठी ते थांबले. मात्र संशय आल्याने ते मोटारसायकल सोडून पळून गेले . या प्रकरणी ५ लाख रुपये आणि घडय़ाळाची लाच मागणाऱ्या चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘गुढीपाडव्याला सुट्टी नको’
मुंबई : गुढीपाडव्याला परीक्षा ठेवू नयेत आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी ‘युवा सेने’ने शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सुट्टी देण्याऐवजी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकांनी या संदर्भात ‘शिवसेना’प्रणित ‘युवा सेने’चे कार्यकर्ते आणि मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे, त्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन या दिवशी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची मागणी केली. मात्र, या दिवशी सर्वच शाळांनी सुट्टी जाहीर करावी, यासाठी प्रदीप सावंत यांनी शिक्षण उपसंचालकांना पत्र देऊन या संबंधात परिपत्रक काढण्यात यावे, अशी मागणी केली आहे. पुन्हा पालकांकडून या संबंधात तक्रार आल्यास आक्रमक होण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे ‘क्रेडिंग ग्रेडींग’नुसार घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी, सत्र-२ आणि जुन्या अभ्यासक्रमाच्या सत्र-१ चा निकाल अखेर मंगळवारी जाहीर झाला. गेल्या काही महिन्यांपासून हा निकाल रखडला होता.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी, सत्र-२ आणि जुना अभ्यासक्रम, सत्र-१ चा निकाल अनुक्रमे २४.४६ आणि १७.८६ टक्के इतका लागला आहे.  परीक्षेचा निकाल लवकर लावला जावा, यासाठी विद्यापीठाने अभियांत्रिकी विभागासाठी ऑनलाईन असेस्मेंट प्रक्रिया राबविली होती. तरीही निकाल जाहीर व्हायला काही महिन्यांचा कालावधी गेला. सत्र-१, सत्र-६ व सत्र – ७ चा निकाल मात्र अद्याप जाहीर झालेला नाही.

‘सीईटी’साठी आजपासून ऑनलाइन अर्ज भरणा
मुंबई : शासनातर्फे २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांसाठी घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षेसाठी (सीईटी) ५ मार्चपासून ऑनलाईन अर्ज घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा ८ मे रोजी होणार आहे. एमबीबीएस, बीएसस्सी-नर्सिग अॅण्ड बीव्हीएससी आदी अभ्यासक्रमांसाठी ही सामाईक परीक्षा होणार आहे.