Mumbai News, News in Mumbai, Mumbai City News
गुन्ह्य़ात अडकविण्याची धमकी देऊन पोलीस ठाण्यातच १५ हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उल्हासनगर-१ चे पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण आणि त्याचा खासगी चालक रमेश चंदानी या दोघांना सोमवारी अटक केली.
म्हारळ येथील अतिक्रमित सरकारी भूखंड पालिका किंवा महसूल विभागाने ताब्यात घ्यावेत म्हणून उल्हासनगरचे नागरिक योगीराज देशमुख यांनी पत्रव्यवहार केला होता. या भूखंडांवर राम वाधवानी यांची बांधकामे केली आहेत. ती बांधकामे तुटतील म्हणून वाधवानी यांनी देशमुख यांच्याविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात खोटय़ा तक्रारी केल्या. त्याचा आधार घेत देशमुख यांना खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविण्याची धमकी देऊन चव्हाण याने देशमुखकडे १५ हजाराची लाच मागितली होती. या प्रकरणी देशमुख यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
शिक्षक संघटनांची मंत्रालयात गांधीगिरी
मुंबई : विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने केलेल्या मूल्यांकनात २०१२मध्ये पात्र ठरलेल्या ४०० प्राथमिक शाळांना अनुदान मिळाले. मात्र ५८ माध्यमिक शाळांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सोमवारी मंत्रालयात शिक्षण तसेच वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना गुलाबाची फुले वाटली. प्राथमिक शाळांच्या अनुदानासाठी वित्त विभागाने १७२ कोटींची तरतूद केली आहे. पण माध्यमिकच्या ५८ शाळांसाठी ९.४४ कोटींची तरतूद करताना आर्थिक निधी नसल्याचे कारण दिले आहे. वित्त विभागाने शेरा लिहिलेली फाइल पुन्हा शिक्षण विभागाकडे पाठविली.शिक्षण विभागाने पुन्हा त्याचा प्रस्ताव सादर करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने ही प्रक्रिया रखडल्याचे कृती समितीचे मुंबई अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले.
मुंबईत नागरी दहशतवादविरोधी प्रशिक्षण केंद्रास मंजुरी
मुंबई : ‘फोर्स वन’ आणि ‘जलद प्रतिसाद पथका’तील कमांडोंना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने ‘नागरी दहशतवादविरोधी प्रशिक्षण केंद्र’ उभारणीस मान्यता दिली आहे. गोरेगाव येथे हे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी ‘फोर्स वन’ आणि ‘जलद प्रतिसाद पथका’ची स्थापना करण्यात आली होती. त्यातील कमांडोंना भरतीपूर्व प्रशिक्षण, सेवांतर्गत प्रशिक्षण आणि उजळणी प्रशिक्षण देण्यासाठी कायमस्वरूपी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव होता. त्याला मंजुरी मिळाली असून गोरेगावातील आरे दुग्ध वसाहतीजवळ हे नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील कमांडोंना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे आणि स्फोटकांचे ज्ञान असलेले तसेच डीडीआय कोर्स केलेले, एनएसजी, पॅरा कमांडो, आर्मी, पोलीस दल येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर घेण्यात येणार आहे.
पाण्याच्या टाकीत पडून मुलीचा मृत्यू
ठाणे : पाणी आणण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षांच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना बदलापूरमधे घडली. अंकिता राजभर असे या मुलीचे नाव असून, शुक्रवारी रात्री मांजर्ली भागात तिचा मृतदेह सापडला. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.