ठाणे-कळवा स्थानकादरम्यान सोमवारी प्रचंड गर्दी असलेल्या लोकलमधून पडून मोहम्मद हुसेन सिद्दकी शेख (२२) या प्रवाशाचा मृत्यु झाला तर आकाश सखाराम कुडमते (२०) हा जखमी झाल्याची घटना घडली. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे गाडय़ांना मोठी गर्दी होती. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.
दादर-भायखळा स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्याचा फटका उपनगरीय रेल्वे सेवेला बसला. उशीरा धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. मोहम्मद शेख हा तरूण मुंब्रा येथून कुर्लाकडे जाण्यासाठी सव्वा दहा वाजता रेल्वेत चढला. मात्र, गर्दीमुळे तो लोकलच्या दरात उभा राहून प्रवास करीत होता. त्यावेळी तोल सुटून तो धावत्या लोकलमधून खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत यवतमाळ येथील आकाश सखाराम कुडमते (२०) हा तरूण सेवाग्राम एक्स्प्रेसमधून ठाणे स्थानकाजवळ गाडीतून खाली पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली .
होमिओपथी डॉक्टरांच्या प्रश्नी अध्यादेश काढण्याचा निर्णय
मुंबई : होमिओपथी डॉक्टरांना अॅलोपथी उपचार करण्यास परवानगी देण्याबाबत अध्यादेश जारी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला. अॅलोपथी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना औषधशास्त्राचा एक वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. या अटीवर होमिओपथी डॉक्टरांना अॅलोपथी व्यवसाय करण्याची परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आधीच घेतला आहे. त्यासाठी दोन कायद्यांमध्ये दुरूस्ती करणे आवश्यक असून विधिमंडळ अधिवेशन नसल्याने अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
शहापूर : मित्रमंडळी व कुटुंबासमवेत तानसा तलावाजवळ वन भोजनासाठी गेलेल्या भुषण मल्हारी मकडे (२६) या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. सोमवारी सकाळी त्या तरूणाचा मृतदेह पाणबुडय़ांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. शहापूरातील वारघडे नगरमध्ये भूषण मकडे राहत होता. रविवारी दुपारी भुषण, त्याची आई, भाऊ व मित्र तानसा तलावाकाठी वनभोजन करण्यासाठी गेले होते. वन भोजन झाल्यानंतर तो पॅगोडा स्पॉट येथील तानसा तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडला. त्याला शोधण्यासाठी भिवंडी अग्नीशमन दल व डॉकयार्ड येथील पाणबुडय़ांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकांना सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.
कार अपघातात तीन ठार,दोन जखमी
शहापूर : शिर्डी येथून मुंबईच्या दिशेने जाणारी स्कोडा गाडी झाडाला आदळून तीन साईभक्त ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील खातिवली येथे रविवारी सायंकाळी घडली. राखी रामदास लोटलीकर (५८), प्रकाश सुर्या शिरोडकर (६५), त्यांची पत्नी प्रफुल्ला शिरोडकर (५८) या तिघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. कारचालक परिंदा सत्यम लोटलीकर व पलक सत्यम लोटलीकर हे दोघीजणी गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण गोवा येथे राहणारे असून ते शिर्डी येथे साईबाबा मंदीरात दर्शनासाठी गेले होते. तेथून मुंबईला नातेवाईकांकडे जात असताना हा अपघात झाल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले.