मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून मुंबईलगतच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याचा इशारा दिला. नवी मुंबईतील महापे येथील आपत्कालीन हेल्पलाइन ११२ वर याबाबतचा दूरध्वनी आला होता. त्यानंंतर याबाबतची माहिती मुंबई पोलसांना कळवण्यात आली. त्यानंतर संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते.

धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर लगेचच मुंबई पोलीस सतर्क झाले असून, समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. दूरध्वनी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासासह सखोल चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा दूरध्वनी नेमका कुठून आला, तसेच तो कोणी केला त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासणीत माहिती तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणाकडे गुप्तचर विभाग व दहशतवादविरोधी पथकही (एटीए) गांभीर्याने पाहत असून संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच नौदलालाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत यापूर्वीही विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही खोट्या ठरल्या, तर काही वेळा सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागली होती. मात्र त्यानंतर पोलिसांना प्रत्येक धमकीची, तसेच माहितीची दखल घ्यावी लागते.