मुंबई : हास्य अभिनेता कपील शर्मा याच्या कॅनडातील कॅफेवर झालेल्या गोळीबारामुळे तो सॉफ्ट टार्गेट बनला आहे. या गोळीबाराच्या निमित्ताने एका तरुणाने अनोखी संधी साधली. या गोळीबारामुळे कपिल शर्मा घाबरला असावा असे वाटल्याने त्याच्याकडून १ कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी तरुणाने धमकी दिली. गुन्हे शाखेने तरुणाला अटक केल्यानंतर चौकशीत हा खुलासा झाला. त्याला झटपट श्रीमंत व्हायचे होते म्हणून त्याने हे कृत्य केले. त्याचे कुठल्याही टोळीशी संबंध नसल्याचे आढळून आले आहे.

कपिल शर्मा प्रसिध्द हास्य अभिनेता आहे. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी कपिला शर्मा आणि त्याच्या सहाय्यकाला धमकीचे फोन आले होते. कुख्यात अंडरवर्ल्ड गुंड रोहीत गोद्रा आणि गोल्डी बार यांच्या नावाने धमकी देऊन १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. कपिल शर्मा याच्या कॅनडा येथील कॅफेवर नुकताच गोळीबार झाला होता. या पार्श्वभूमीवर धमकी आल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले होते. या प्रकऱणाचा तपास गुन्हे शाखा- ८ कडे सोपविण्यात आला होता.

आरोपी बेरोजगार तरूण

मुंबई गुन्हे शाखा ८ च्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला असून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपी दिलीप चौधरी याला पश्चिम बंगालमधील २४ परगणा येथून अटक केली. त्याचा कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्याच्या संधीचा त्याने फायदा घेतला. वातावरण गरम आहे, कपिल शर्मा घाबरला असेल आणि पैसे देईल असे त्याला वाटले आणि म्हणून त्याने १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फोन केला, असे पोलिसांनी सांगितले.

झटपट पैशांसाठी

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आरोपी दिलीप चौधरी हा पश्चिम बंगालमधील २४ परगणा येथील राहिवासी आहे. तो बेरोजगार आहे. त्याला झटपट श्रीमंत व्हायचे होते. त्याने कपिल शर्मा आणि त्याच्या सहाय्यकाचा मोबाइल क्रमांक मिळवला आणि धमकी दिली. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही असे त्याला वाटले होते.

दोन वेळा गोळीबार

कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर दोन वेळा गोळीबार करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तींनी १० जुलै रोजी कॅफेवर गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु कॅफेच्या भिंती आणि खिडक्यांचे नुकसान झाले. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर (सोशल मीडिया) व्हायरल झाली. दुसरा गोळीबार एक महिन्याच्या अंतराने ७ ऑगस्ट २०२५ रोजी झाला. यावेळी किमान २५ गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात काही गोळ्या कॅफेच्या भिंतींना लागल्या. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही गोळीबारांची जबाबदारी गोल्डी ढिल्लन आणि लॉरेन्स बिश्नोई या दहशतवादी संघटनांनी सोशल मीडियावर पोस्ट करून घेतली. या पोस्टमध्ये ‘मुंबई पुढे’ अशी धमकी दिली आहे, त्यामुळे भारतातील सुरक्षा यंत्रणांनी चिंता व्यक्त केली आहे.