शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकारी व व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आल्याची माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस योग्य ठिकाणी योग्य कारवाई करतील असे संकेत देणारं वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलंय.
“आम्ही एसआयटीची स्थापना केली असून अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी काम करेल. त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल,” अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. गृहमंत्री आज जनता दरबारसाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ईडीला हाताशी घेऊन खंडणीचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. राऊत यांनी या प्रकरणी नवलानी व ईडी अधिकाऱ्यांनी काही कंपन्यांकडून रक्कम घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी कंपन्यांना नोटीस बजावून प्रकरणात अधिक माहिती देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी तक्रारदार अरिवद भोसले यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करण्यास सांगण्यात आले होते.
नक्की पाहा >> Video: भाषण सुरु असतानाच अजान सुरु झाली अन् गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी…; शिरुरमधील सभेतील व्हिडीओ चर्चेत
उपायुक्त दर्जाचा अधिकारी ही चौकशी करत होते. पण याप्रकरणी आर्थिक गुन्हा नसून हे खंडणीचे प्रकरण असल्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला वर्ग करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू या विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
प्रभू यांच्यासह विविध क्षेत्रांत तपासाचा अनुभव असलेल्या अधिकारी या विशेष पथकात आहे. या प्रकरणाच्या हस्तांतराची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाली असून लवकरच या प्रकरणी तक्रारदारासह इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या काळामध्ये प्रक्षोभक भाषणे करून समाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून बरोबर नाही. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. नाशिकच्या पोलिस आयुक्त पत्र प्रकरणावर बोलताना सदर गोष्ट त्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली पाहिजे असे सांगितले. विरोधकांच्या मंदिरांवरून स्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याच्या प्रकरणावरून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना पोलीस प्रशासन करेल, असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा >> “असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही…”; मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचं दिलीप वळसे-पाटलांना थेट आव्हान
राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार आहेत. यामुळे कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तर त्यासंदर्भात पोलिसांना काही आदेश दिलेत का असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “पोलिसांना रोज आदेश देण्याची गरज नसते. पोलिसांना त्यांचं काम माहितीय, काय करायचंय ते. समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून जी आवश्यक कृती आहे ते ती करतील,” असं गृहमंत्री म्हणाले.