मुंबई : मुंबई पोलीस दलात यापुढे पोलिसांना पदोन्नती जाहीर झाल्यानंतर संबंधित पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुटुंबीयांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पदोन्नती बहाल करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार मुंबई पोलीस दलातील शिपाई, नाईक, हेड कॉन्स्टेबल आदी पाचशेहून अधिक पोलिसांना पदोन्नती बहाल करण्याचा समारंभ अलीकडेच संपन्न झाला.

पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झालेल्या पोलिसांना सहायक उपनिरीक्षकपदापर्यंत तर उपनिरीक्षक म्हणून थेट भरती झालेल्या पोलिसांना सहायक आयुक्तपदापर्यंत पदोन्नती दिली जाते. संरक्षण दलात विशिष्ट समारंभात अशी पदोन्नती बहाल करण्याची पद्धत आहे. तीच पद्धत पोलिस दलातही पाळली जात होती. मात्र कालांतराने ही पद्धत बंद पडली होती. पदोन्नती मिळालेले काही पोलीस आपल्या वरिष्ठांना विनंती करुन पदोन्नती समारंभपूर्वक घेत होते. काही वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांची ही मागणी मान्यही करीत होते. परंतु आता पोलीस आयुक्तांनी पदोन्नती समारंभपूर्वक बहाल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांची पदोन्नती हा केवळ प्रशासकीय सोपस्कार राहता कामा नये, असे भारती यांचे म्हणणे असून त्यांना समारंभपूर्वक पदोन्नती बहाल करावी, असे परिपत्रकही त्यांनी जारी केला आहे.

पदोन्नती केवळ पदवाढ नसून त्यामागे संबंधित पोलिसांची कर्तव्याप्रती असलेली निष्ठा व वर्षानुवर्षाची मेहनत दडलेली आहे. त्यापर्यंतच्या सेवाकाळात या पोलिसांनी निभावलेली जबाबदारी, कर्तृत्त्व व समर्पणाला दिलेली ही मान्यता आहे. त्यामुळे पदोन्नती हा फक्त प्रशासकीय सोपस्कार न राहता तो पदोन्नती मिळालेल्या पोलिसांंचा प्रेरणास्त्रोत व्हावा, यासाठी त्यांना सन्मानपूर्वक पदोन्नती बहाल करावी, असे भारती यांनी म्हटले आहे. पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षकापर्यंत अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी तर उपनिरीक्षक ते सहायक पोलीस आयुक्तांना सहपोलीस आयुक्तांनी पदोन्नती बहाल करावी, असे आदेशही या परिपत्रकात म्हटले आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात १६९ हेड कॉन्स्टेबलला सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी तर २१३ पोलीस शिपाई-नाईक यांना हेड कॉन्स्टेबलपदी पदोन्नती देण्यात आली. याशिवाय ६९ हेड कॉन्स्टेबर चालक आणि १०१ पोलीस शिपाई-नाईक चालकांनाही यावेळी पदोन्नती देण्यात आली.

संबंधित प्रादेशिक विभागातील अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी ही पदोन्नती संबंधित पोलिसांना प्रदान केली. पदोन्नती मिळाल्यानंतर येणाऱ्या महिन्याच्या पहिल्या तारखेला शक्यतो हा समारंभ करावा, असेही त्यांनी या परिपत्रकात म्हटले आहे. पोलीस आयुक्तांच्या या आदेशामुळे वरिष्ठांना आता जाणीवपूर्वक कनिष्ठांचा पदोन्नती समारंभ आयोजित करावा लागणार आहे.आयुक्तांच्या या आदेशाचे पोलीस दलात स्वागत करण्यात आले आहे.