लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई पोलिसांनी हरवलेली मुले आणि महिलांना शोधून काढण्यासाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम १७ एप्रिल ते ३० मे या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हरवलेली अथवा अहपरण झालेली १८ वर्षांखालील मुले आणि १८ वर्षांवरील महिलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या मोहिमेमागे आहे.

या उपक्रमांतर्गत, मुंबई पोलीस प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न करून शक्य तितक्या हरवलेल्या महिला आणि मुलांचा शोध घेणार आहेत. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी पोलिसांनी नागरिक व बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कुठल्याही संशयास्पद स्थितीत असलेले मूल आढळल्यास त्याच्याशी नम्रतेने संवाद साधावा आणि शक्यता असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाशी १०० क्रमांकावर किंवा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर संपर्क साधवाल, तसेच जवळच्या पोलीस ठाण्यातही संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेदरम्यान नागरिकांनी रेल्वे स्थानके, बस स्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने या ठिकाणी किंवा रस्त्यांवर भिक मागणारी किंवा कचरा उचलणारी मुले आढळल्यास त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कोणतेही अल्पवयीन मूल घरगुती काम करताना आढळल्यास किंवा पालकांशिवाय भटकताना आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

याशिवाय, जर एखादे मूल संशयास्पद वाटत असेल किंवा हरवलेले भासत असेल, तर त्याचा फोटो मिशन वात्सल्यच्या वेबसाइटवरील ”लॉस्ट अँड फाउंड” पोर्टलवर https://missionvatsalya.wcd.gov.in या लिंकवर अपलोड करावे, असेही पोलिसांनी सूचित केले आहे. सर्व नागरिकांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी व्हावे आणि हरवलेल्या महिला व मुलांना त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai polices special campaign for missing women and children mumbai print news mrj