मुंबई : खासगी ॲप आधारित टॅक्सीचालकाने एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी चालकाविरोधात विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी १४ वर्षांची असून पवई येथे राहते. ती बुधवारी प्रभादेवी येथील शैक्षणिक संस्थेत गेली होती. तिने बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास घरी जाण्यासाठी एका खासगी ॲप आधारित कंपनीची गाडी आरक्षित केली. त्यानुसार तिने आरक्षित केलेली गाडी आली. ती एमएच डब्ल्यू एन १८२४ या क्रमांकाच्या वाहनात बसली. मात्र चालकाने गाडी पवई येथील तिच्या नमूद केलेल्या पत्त्यावर न नेता पूर्व द्रुतगती महामार्गावरील एका निर्जन ठिकाणी नेऊन थांबवली आणि कुणी नसल्याचे पाहून तिच्यासोबत गैरवर्तन केले.
मुलीने घरी येऊन आपल्या वडिलांना हा प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी दादर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. या प्रकरणी दादर पोलिसांनी उबेर कंपनीचा चालक श्रीयांस याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२ अंतर्गत विनयभंग, तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खासगी ॲप आधारित टॅक्सी सुरक्षित मानली जाते. परंतु अशा घटनांमुळे या टॅक्सीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.