मुंबई : मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात येत असल्यामुळे खड्ड्यांची संख्या कमी होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र गेल्या महिन्याभरात मुंबई महापालिकेच्या यंत्रणेने तब्बल सहा हजारांहून अधिक खड्डे बुजवले आहेत. रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींसाठी मुंबई महापालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे ॲप जून महिन्यापासून सुरू केले असून या ॲपवर खड्ड्यांच्या ३ हजार ४५१ तक्रारी आल्या. तर पालिकेच्या यंत्रणेने स्वत:हून ३२९७ खड्डे बुजवले. आतापर्यंत किती खड्डे बुजवले, किती तक्रारी आल्या याच्या माहितीचा डॅशबोर्डही मुंबई महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होते. डांबरी रस्त्यांवर खड्ड्यां प्रमाण खूप असते. कॉंक्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. त्यामुळे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांंपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले जात आहे. मुंबईत आतापर्यंत १२०० किमी हून अधिक लांबीच्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण झाले आहे. गेल्यावर्षी तब्बल १६ हजाराहून अधिक खड्डे बुजवण्यात आले होते व त्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च आला होता. यंदा हा खर्च कमी झाला असून खड्ड्यांची संख्याही कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र आतापर्यंत डांबरी रस्त्यावरील तब्बल सहा हजाराहून अधिक खड्डे मुंबई महापालिकेने बुजवले आहेत.

रस्त्यांवर आढळणारे खड्डे, तसेच दुरूस्तीयोग्य रस्त्यांसाठी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे ॲप विकसित केले आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ ॲपद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारी, त्यांचे निवारण, प्रत्यक्षातील कार्यपद्धती यांचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

चार ठिकाणी तक्रारी

खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेने यंदा नागरिकांना चार पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यात आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा मदत क्रमांक १९१६ वरही तक्रार नोंदवता येणार आहे. तसेच समाजमाध्यमांवरील पालिकेच्या एक्स अकाऊंटवर, मोबाइल ॲपवर आणि व्हॉट्स ॲप चॅटबॉटवरही तक्रार नोंदवता येणार आहे. व्हॉटसअप चॅटबॉट (क्रमांक: ८९९९२२८९९९) सेवाही सुरू करण्यात आली आहे. याद्वारे खड्ड्यांसंदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहेत. ‘Pothole’ किंवा ‘PT’ (इंग्रजीत), तसेच ‘खड्डा’ किंवा ‘ख’ (मराठीत) असे प्रमुख शब्द (Key Word) वापरून, नागरिक व्हॉट्स ॲप चॅटच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. दरवर्षी २२७ प्रभागातील अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक दिले जात होते. यंदा ते न देता पॉटहोल क्विकफिक्स या ॲपवरून २२७ प्रभागांमधून तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

४८ तासांत खड्डा बुजवणार

नागरिकांनी मोबाइल ॲपवरून खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर ४८ तासांत खड्डा बुजवणे अपेक्षित आहे. ४८ तासांत एखादा खड्डा बुजवला नाही तर ती तक्रार वरिष्ठ पातळीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच पोहोचणार आहे. तसेच एखादा खड्डा बुजवल्यानंतर नागरिकांचे समाधान झाले नाही तर त्यांना त्याच खड्ड्याची तक्रार पुन्हा करता येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. ९ जूनपासून ॲप सुरू झाले असून त्यावर आतापर्यंत ३ हजार ४५१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी ३ हजार २३७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर, ११४ तक्रारींच्या निवारणाची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. खड्ड्यांव्यतिरिक्त इतर विभागांच्या ९३१ तक्रारी देखील ॲपवर प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्या असल्याचीही माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.