मुंबई : ‘संकटात धैर्य, संघर्षात साहस आणि विजयात विनम्रता शिका’ अशी मारुतीरायाची शिकवण देणाऱ्या ‘हुप्पा हुय्या’ या चित्रपटाचा सिक्वेल तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी समाजमाध्यमातून ‘हुप्पा हुय्या २’ ची अधिकृत घोषणा केली. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अभिनेता सिध्दार्थ जाधवच्या कारकिर्दीसाठी महत्वाचा ठरला होता. आता पुन्हा एकदा सिक्वेलच्या रुपाने नव्या वर्षाची भेट आपल्याला मिळाली, अशा शब्दांत सिध्दार्थने ‘लोकसत्ता’शी बोलताना आनंद व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हुप्पा हुय्या’ म्हटल्यावर ‘जय बजरंगा’ अशी गर्जना आपसूकच तोंडून निघते. इतकी लोकप्रियता मिळवणाऱ्या समित कक्कड दिग्दर्शित ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. समित कक्कड फिल्म्स प्रस्तुत ‘हुप्पा हुय्या २’ची निर्मिती अमर कक्कड, पुष्पा कक्कड आणि समित कक्कड हे करीत असून, संगीत-दिग्दर्शन अजित परब यांचे तर लेखन हृषिकेश कोळी यांचे असणार आहे. पहिल्या चित्रपटातील कथा ही अधिक भावप्रधान होती, त्याचा गाभा तसाच ठेवत व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर या पुढच्या भागात अधिक असणार आहे, असे निर्माता-दिग्दर्शक समित कक्कड यांनी स्पष्ट केले. सिध्दार्थ जाधव याही चित्रपटात मुख्य भूमिकेत असून काही नवीन व्यक्तिरेखा आणि कलाकारांचाही यात समावेश होणार असल्याचेही समित कक्कड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…काम न करणाऱ्यांवर कारवाईची हिंमत नाही ! शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली! भास्कर जाधव यांचा ठाकरेंना घरचा आहेर

‘हुप्पा हुय्या २’ची अधिकृत घोषणा आणि दिग्दर्शक समित कक्कड यांनी पाठवलेले चित्रपटाचे पोस्टर पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे, असे सिध्दार्थने सांगितले. सिध्दार्थ जाधवचा पडद्यावर मुख्य नायक म्हणून लोकांसमोर आणणारा ‘हुप्पा हुय्या’ हा पहिला चित्रपट होता. त्या आठवणीला उजाळा देताना नायक म्हणून माझी सुरूवात करून देणाऱ्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल १५ वर्षांनी पुन्हा येत आहे. माझ्या चित्रपट कारकिर्दीलाही लवकरच २५ वर्ष पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर ‘हुप्पा हुय्या २’च्या घोषणेमुळे मी प्रचंड आनंदात आहे, असे सिध्दार्थने सांगितले. सध्या चित्रपटाच्या लेखनाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर चित्रिकरणाला सुरुवात होईल. हा प्रवास रंजक असणार आहे, असेही त्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai sequel of siddharth jadhavs film huppa huyya released after long time of 15 years mumbai print news sud 02