ग्रामपंचायतीच्या हद्दीत जन्मलेल्यांना आपला जन्म दाखला किंवा ज्यांचा मृत्यू ग्रामपंचायतीच्या हद्दीत झाला आहे अशांच्या वारसांना मृत्यू दाखला ऑनलाइन मिळणार आहे. ग्राम विकास विभागाने तयार केलेल्या या ऑनलाइन सुविधेचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी केले. ग्रामविकास विभागाने ‘संग्राम सॉफ्ट’ ही आज्ञावली तयार केली असून त्यात आतापर्यंत एक कोटी ७८ लाख जन्मनोंदींचे तर ७८ लाख मृत्यू नोंदीचे संकलन आहे. याचप्रमाणे ज्या ग्रामस्थांच्या मिळकती ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत त्यांना नमुना ८ चा दाखला http://sangram.co.in या संकेतस्थळावर ऑनलाइन मिळणार आहे. ग्रामविकास विभागाने जन्म-मृत्यू व नमुना ८ या नोंदींचे डिजिटायझेशन करण्याची मोहिम राबविली. मंत्रिमंडळाच्या बठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांचा जन्मदाखला ऑनलाइन प्राप्त करून त्याची प्रत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धस यांना देण्यात आली.

अल्पवयीन मुलावर काका, भावाचा हल्ला
ठाणे : घर नावावर करून देण्यास नकार देणाऱ्या भावाच्या अल्पवयीन मुलावर काका आणि चुलत भावाने चाकूने हल्ला केल्याची घटना राबोडी येथे मंगळवारी रात्री उशिरा घडली. अमीर शेख (१६) असे या जखमी मुलाचे नाव आह़े  या प्रकरणी राबोडी पोलिसांनी तौफिक वाहीद शेख याला गुरुवारी अटक केली असून मिया वाहीद शेख हा हल्लेखोर मात्र फरार आहे.अमीर शेख राबोडी येथील क्रांतीनगर परिसरात राहात असून याच घरामध्ये त्याचा चुलत भाऊ तौफिक आणि काका मिया राहतात. घर नावावर करून घेण्यासाठी त्यांनी अमीरच्या वडिलांमागे तगादा लावला होता. परंतु त्यांनी नकार दिला होता, अशी माहिती पोलीस उप निरीक्षक बी. आर. सोनोने यांनी दिली.

पदपथावरील चिमुरडीवर बलात्कार
मुंबई  :पदपथावर झोपणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक गुरूवारी पहाटे कांदिवली येथे घडली. विशेष म्हणजे या आरोपीने मुलीच्या आईवरही काही दिवसांपूर्वी बलात्काराचा प्रयत्न केला होता. कांदिवलीच्या महात्मा गांधी रोडवर ही मुलगी आईवडील आणि लहान भावासह पदपथावर राहते. गुरुवारी पहाटे ती झोपली असताना आरोपीने तिला निर्जन स्थळावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पहाटे तिच्या आई वडिलांच्या हा प्रकार लक्षात आला. बलात्कार करणारा आरोपी २५ ते ३० वर्षांचा असून तो ‘गर्दुल्ला’ आहे. मुलीला घेऊन जातानाचे आरोपीचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले आहे. याच आरोपीने आपल्यावरही बलात्काराचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार मुलीच्या आईने दिली आहे.