मुंबई : राज्यातील भटक्या श्वानांची संख्या सात वर्षांत ६० हजारांहून अधिकने वाढल्याचे पशुधन जनगणनेतून समोर आले आहे. राज्यात २०१२ मध्ये १२ लाख १६ हाजर ९३ भटके श्वान होते, तर २०१९ मध्ये ही संख्या वाढून १२ लाख ७६ हजार ३९९ वर पोहोचली आहे. दरम्यान, ही वाढ मानव प्राणी संघर्ष, रस्ते अपघात आणि पशुजन्य आजारांच्या धोक्याच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे.
पशुधन जनगणना २०१९च्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण भटक्या श्वानांची संख्या २०३.३१ लाख असून, १७ राज्यांमध्ये या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक यांचा त्यात समावेश आहे. तामिळनाडूसारख्या काही राज्यांत मात्र भटक्या श्वानांची संख्या कमी झाली आहे. मुंबईत मात्र परिस्थिती वेगळी आहे. मुंबईत २०१४ मध्ये ९५ हजार १७२ भटक्या श्वानांची नोंद होती, ती २०२४ मध्ये घटून ९० हजार ७७५ इतकी झाली. मुंबई महानगरपालिका आणि इतर काही संस्थांच्या संयुक्त निर्बीजीकरण मोहिमेमुळे श्वानांच्या संख्येत घट झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
रस्त्यांवरील श्वानांची घनता १०.५४ प्रति किमी वरून ८.०१ प्रति किमीपर्यंत खाली आली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १९९४ पासून आतापर्यंत ४.३ लाखांहून अधिक श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यभारात श्वानांची संख्या सात वर्षांत ६० हजारांनी वाढली असून ही बाब चिंताजनक आहे. मुंबईमध्ये निर्बीजीकरण मोहिमेमुळे काही प्रमाणात घट झाली असली तरीही नवी मुंबईत वाढती संख्या आणि नागरिकांना होणाला त्रास लक्षवेधी आहे.
नवी मुंबईची परिस्थिती
नवी मुंबईत २०११ मध्ये भटक्या श्वानांची संख्या अंदाजे ३० हजार होती. २००६ ते २०२४ या कालावधीत १ लाख ८ हजार ७३५ श्वान पकडण्यात आले होते. त्यापैकी ५९ हजार ८२७ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले. त्यामुळे या भागात सध्या अंदाजे २० ते २२ हजार श्वान असण्याची शक्यता आहे.
चावा घेतल्याच्या घटना
दरवर्षी श्वानांने चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यात २०२२ मध्ये श्वानांनी चावा घेतल्याच्या ३ लाख ९३ हजार २० घटना घडल्या होत्या. तसेच श्वानांनी चावा घेतल्याच्या २०२३ मध्ये ४ लाख ७२ हजार ७९०, २०२४ मध्ये ४ लाख ८५ हजार ३४५, तर जानेवारी २०२५ मध्ये ५६ हजार ५३८ इतक्या घटना घडल्या होत्या.