मुंबईच्या हवामानाला उष्म्याकडे घेऊन जाणाऱ्या कमाल तापमानात अचानक घट झाल्यामुळे मुंबईकरांचा रविवार चांगलाच गारेगार गेला असला, तरी सोमवारी पुन्हा एकदा पाऱ्याने चार अंश सेल्सिअसची उसळी घेतली. मात्र किमान तापमानाचा पारा साधारणपणे तेवढय़ाच अंशांनी खालावल्याने मुंबईत हवामानाची स्थिती ‘जैसे थे’ होती. पण रविवारी मुंबईभोवती गुंडाळलेली धुक्याची दुलई मात्र सोमवारी अलगद उचलल्याने गारवा कमी जाणवत होता. परिणामी मुंबईचा पारा दोलायमान असल्याची स्थिती सोमवारी पाहायला मिळाली.
जानेवारी महिन्यात १३ अंश सेल्सिअसवर घसरलेले किमान तापमान जानेवारी महिन्याच्या अखेरपासून चांगलेच चढायला लागले होते. त्यातच उत्तरेकडून येणारे थंड वारे मुंबईला पोहोचेपर्यंत क्षीण होत असल्याने कमाल तापमानातही वाढ झाली होती. जानेवारी महिन्यात २५ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत असलेल्या कमाल तापमानाने फेब्रुवारीत उसळी घेत ३५ अंश सेल्सिअसचा पारा गाठला. रविवारी पुन्हा एकदा या तापमानात घट झाली आणि पारा २९ अंश सेल्सिअसपर्यंत घरंगळला. याच वेळी किमान तापमानही १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्याच वेळी रविवारी या थंडीला धुक्याची जोड मिळाल्याने थंडी अधिकच जाणवली.
सोमवारी मात्र मुंबईच्या हवामानाने कूस बदलली. रविवारी पहाटेच्या वेळी पडलेले दाट धुके सोमवारी छूमंतर झाले होते. त्याचप्रमाणे दिवसभरात कमाल तापमानातही चार अंशांनी वाढ होऊन ३३ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. दरम्यान, किमान तापमान मात्र तीन अंशांनी खाली सरकत १४.२ अंश सेल्सिअसवर स्थिरावले. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऱ्याचा हा खेळ सुरू राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai the maximum temperature increase by 4 degree c