KEM Hospital COVID-19 Deaths: हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये करोनाबाधित असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र हे मृत्यू करोनामुळे झाले नसून त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या आजारामुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

केईएम रुग्णालयात रविवारी सकाळी ५८ वर्षीय एका महिलेचा संशयित करोनाने मृत्यू झाला असल्याचे उघडकीस आले. परळ येथे राहत असलेल्या या ५८ वर्षीय महिलेला १४ मे रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या रुग्णकक्ष क्रमांक २० मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी घेण्यात आलेल्या स्वॅबच्या चाचण्यांमध्ये इतर कोणत्याही आजारांची लागण असल्याचे आढळले नाही. मात्र आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालामध्ये त्या महिलेला करोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मृत्यूचे कारण करोना असल्याचे दिसते,” असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना सांगितले.

त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयामध्ये १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या दोन्ही रुग्णांना करोना झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. मात्र या दोन्ही रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सहव्याधी कारणीभूत

५८ वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे, तर १३ वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालामध्ये त्या करोनाबाधित असल्याचे निदान झाले असले तरी या दोन्ही रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला नसल्याचे केईएम रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संदेश परळकर यांनी सांगितले.

घाबरू नका ….

करोनानंतर रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा नियम झाला आहे. करोना आता सर्वसाधारण तापासारखा आजार झाला आहे. ज्यांना श्वास घेण्यास त्रास, खोकला किंवा गंभीर सर्दी आहे त्यांच्यात सामान्यतः करोनाचे विषाणू आढळत असल्याने त्यांचा अहवाल बाधित येतो. त्यामुळे हा विषाणू परत आला आहे किंवा तो पुन्हा पसरत आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.
या महिलेच्या व मुलीच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण करोना हे नसून ते वेगळे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.

आठवड्यात १५ रुग्ण

मागील आठवड्या करोना बाधित १५ रुग्ण आढळले होते. अशी माहिती केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी दिली.