मुंबई : सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठातील व्यवसाय प्रशिक्षण आणि सेवा योजन कक्ष, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर (महाराष्ट्र शासन), नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात हा मेळावा होणार आहे.
मुंबई विद्यापीठात होत असलेल्या या रोजगार मेळाव्यात २५ हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून १ हजार ६०० हून अधिक रोजगाराच्या संधी विविध शैक्षणिक विद्याशाखांतील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
यामध्ये माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन, औषध निर्माण व सेवा क्षेत्रातील विविध संधींचा समावेश आहे. कौशल्य विकास केंद्रांतर्फे राज्यभर असे रोजगार मेळावे आयोजित केले जात असून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्वरित निवड केली जाते. इच्छुक उमेदवारांनी
या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले आहे.
कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश ?
मुंबई विद्यापीठात होणाऱ्या मेगा रोजगार मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, थॉमस कुक, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, पँटलून्स, लुपिन लिमिटेड, सुथरलँड यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे.