मुंबई : २८ वर्षीय तरुणीच्या मोहजालात अडकणे एका प्रथितयश वकिलाला चांगलेच महागात पडले आहे. या तरूणीने आधी गोड बोलून आणि नंतर अश्लील छायाचित्रांच्या आधारे धमकावून तब्बल दीड कोटी रुपये उकळले. यात तिचे कुटुंबियही सामील होते. याप्रकरणी पोलिसांनी सदर तरूणीसह चौघांविरोधात गुन्हे दाखल केला आहे.
तक्रारदार वकील ५२ वर्षांचे असून पश्चिम उपनगरात वास्तव्यास राहतात. मे २०२४ मध्ये एका कार्यक्रमात वकिलाची एका तरूणीबरोबर भेट झाली. ती मूळची हिमाचल प्रदेशातील असून मॉडलींग करत होती. वकील ६ जून रोजी परदेशात गेले होते. त्यावेळी तरुणीने त्यांना फोन केला. एक नातेवाईक आजारी असून त्यासाठी ५० लाख रुपये मागितले. त्यावेळी वकिलाने आपल्या खात्यातून अडीच लाख रुपयांची मदत केली. यानंतर मॉडलिंगच्या कामासाठी तिने अडीच लाख रुपये घेतले. वकिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार तरुणी सतत त्यांना भेटण्याचा आग्रह करत होती. तिने त्यांना मोहजालात अडकवले आणि शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ती वारंवार पैशांची मागणी करू लागली. तिने चित्रीकरणासाठी १० लाख रुपये घेतले. एकदा गावी जाण्यासाठी ३० लाख घेतले. असे अनेक वेळा तिने त्यांच्याकडून पैसे घेतले.
दोघेही एकदा बाली येथे गेले होते. त्यावेळी तरुणीने त्यांच्याकडे २० लाख रुपये मागितले. मात्र त्यांनी ते देण्यास नकार दिला. यावेळी तरुणीने आयड्रॉप या सॉफ्टवेअरमध्ये दोघांची आक्षेपार्ह छायाचित्रे दाखवली. वकिलाच्या नकळत तिने ही छायाचित्रे काढली होती. पैसे दिले नाही तर ही छायाचित्रे व्हायरल करून बदनामी कऱण्याची धमकी तिने दिली. त्यामुळे घाबरून वकिल तिला पैसे देऊ लागले.
पैसे देण्यास विलंब झाल्यास तरुणीच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांना धमकावू लागले. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भितीही त्यांना घातली. त्यामुळे घाबरून त्यांनी ३० लाख रुपये दिले. जुलै २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत त्यांनी तरुणीला तब्बल दीड कोटी रुपये दिले. मात्र तरीही तिच्याकडून पैशांची मागणी सुरूच होती.अखेर वकिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणी, तिच्या कुटुंबातील सदस्य आणि मैत्रिणीविरोधात खंडणी, धमकावणे आदी विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले.